
जोत्याच्या बांधकामाला आकारली घरपट्टी
नेरळ, ता. १ (बातमीदार)ः नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या नियोजित जागेत अनधिकृत जोत्याचे बांधकाम सुरू असताना त्यावर ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारली आहे. याबाबत ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी हरकत घेतल्यावर संबंधित जागेवर कोणत्याही घराचे बांधकाम नसल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधिताला मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नेरळ ग्रामपंचायतीने बजावली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीतील मोहाची वाडी येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखडा तयार केला आहे. ४० फूट रस्ता तयार करून करणार असून काही जागा आरक्षित केल्या आहेत. परंतु ज्या नकाशात प्राधिकरणाने रस्ता अधोरेखित केला, त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. नेरळ येथील शिवाजी पार्क परिसरात घराचा जोत्याचे काम सुरू आहे. हे अनधिकृत बांधकाम थांबवण्याची प्रक्रिया करण्याऐवजी नेरळ ग्रामपंचायतीने त्यावर घरपट्टी आकारली. १४ ऑक्टोबर २०२० रोजी सुनंदा रवींद्र पोपेटे रा. मोहची वाडी यांनी आपण सर्वे नं २५३ मधील अर्धा गुंठे जागा विकत घेतली असून त्यावर घरपट्टी आकारणीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर ७/१२ उतारा व मोजणी नकाशा आणल्याशिवाय अर्ज मासिक सभेवर, असा शेरा टाकण्यात आला. त्यानंतर अर्जावर घरपट्टी आकारण्यात आली मात्र पोपेटे यांनी कागदपत्रे सादर केले नाही. संबंधित जागा नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या रस्त्याच्या आड येत असल्याने नेरळ येथील ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी यावर आक्षेप घेतला. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीत तक्रार केल्यावर पोपेटे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीने शहानिशा न करता घरपट्टी आकारली आहे. ५०० फुटाची घरपट्टीच्या जागेवर नेरळ ग्रामपंचायतीने थेट १,०३८ फुटांची घरपट्टी आकारली आहे. सातबारा, नकाशा, कशाचीही गरज ग्रामपंचायतला नाही. त्यामुळे अतिक्रमण फोफावत आहे. तक्रार करून १५ दिवस झाले तरी नोटीस देण्यापलीकडे ग्रामपंचायतीने काहीही कारवाई केलेली नाही.
- संदीप म्हसकर, ग्रामस्थ, नेरळ
घराचा केवळ जोता असताना घरपट्टी आकारली आहे. ग्रामपंचायतीच्या नियमानुसारच कर आकारणी केली आहे. तसेच तक्रारदाराच्या अर्जानुसार संबंधित व्यक्तीला मालकीचे दस्तऐवज घेऊन बोलावले आहे अन्यथा त्यावर कारवाई करू
- गणेश गायकर, ग्रामसेवक
संबंधित वादातीत अनधिकृत बांधकाम