
अनैतिक संबंधांतून पतीच्या हत्येची सुपारी
नालासोपारा, ता. १ (बातमीदार) : वसईच्या नायगाव परिसरात हत्या करून फेकलेल्या मृतदेहाचा ४८ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीनेच एक लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. पती अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपी पत्नीसह हत्या करणाऱ्या एका जोडप्याला अटक केली आहे. वसई गुन्हे शाखा कक्ष दोनच्या टीमने या हत्येचा उलगडा केला आहे.
कमरूददिन मोहम्मद उस्मान अन्सारी (३५) असे मृताचे नाव आहे; तर आशिया अन्सारी असे सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव असून बिलाल ऊर्फ मुल्ला निजाम पठाण (४०), सौफिया बिल्ला पठाण (२८) असे हत्या करणाऱ्या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. नायगाव पूर्व रिक्षा स्टॅन्डजवळ खाडीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह २७ जानेवारीला सापडला होता. या हत्येचा वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या हत्येचा उलगडा करून तीन आरोपीला अटक केली आहे.