
महागडे मोबाईल चोरणारा डिलीव्हरी बॉय अटकेत
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : ऑनलाईन मागविलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयनेच २२ महागड्या मोबाईल फोनची चोरी करून कंपनीला तब्बल सात लाख ६२ हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कलिमखान बाबुखान पठाण (वय ३४) असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या घरातून पाच मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
या प्रकणात अटक करण्यात आलेला कलिमखान पठाण हा सीबीडी बेलापूर येथील शहाबाज गावात राहण्यास असून तो खारघरमधील एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत काम करत होता. एनटेक्स या कंपनीच्या वतीने फ्लिपकार्ट या कंपनीकडून ग्राहकांनी मागविलेल्या ऑनलाईन वस्तूंची ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी केली जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये एनटेक्स कंपनीच्या वतीने कंपनीच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली असता, खारघर शाखेमधील मोबाईल फोनची संख्या व हिशेबाचा मेळ बसत नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलची डिलिव्हरी होत नसलेल्या विभागाची माहिती काढली असता कलिमखान पठाण याच्यावर संशय आला. त्यामुळे कंपनीने त्याच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत ठेवली. त्यानंतर कलिमखान हाच कंपनीतील मोबाईलची चोरी करत असल्याचे लक्षात आले. बुधवारी सकाळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने दोन मोबाईल फोनची चोरी केल्याचे कबूल केले.