
राज्य मार्गावरील पुलाचा कठडा नादुरुस्त
शहापूर, ता. ४ (बातमीदार) : शहापूरपासून सुरू झालेला राज्यमार्ग हा किन्हवली, लेनाडमार्गे मुरबाडला जोडला आहे. या रस्त्यांवरील कांबारे पॉवर हाऊसजवळील पुलाचा लोखंडी पाईपचा एक कठडा नादुरुस्त आहे; तर दुसरा गायब असल्याने वाहन चालकांसह व नागरिकांना या पुलावरून जाणे धोकादायक असल्याची लेखी तक्रार भारतीय मानव विकास सेवा संघाने मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली व लेनाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील कांबारे पॉवर हाऊसजवळ असलेल्या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. हा मार्ग पुढे कर्जत, खोपोली असा पुण्याकडे जातो. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूकसुद्धा सुरू असते. तसेच या पुलावरून आजूबाजूला असलेल्या गावांतील नागरिक, महिला, विद्यार्थी पायी जा-ये करीत असतात. या पुलाच्या एका बाजूचा लोखंडी पाईप असलेला कठडा नादुरुस्त झाला आहे; तर दुसऱ्या बाजूला कठडाच नसल्याने चालकांसह व नागरिकांना या पुलावरून जाणे धोकादायक आहे. त्यातच या पुलाच्या खाली बाराही महिने पाणी असल्यामुळे एखादा अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचेही निवेदनातून म्हटले आहे.
-----------------
पक्के बांधकाम करावे
कांबारे पॉवर हाऊसजवळ अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून अपघात टाळण्यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला पक्के कठडे बांधावेत. पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने लोखंडी पाईपही वाहून जातात. त्यामुळे किरकोळ उपाय न करता पक्के बांधकाम असलेले कठडे दोन्ही बाजूला बांधावेत, अशी मागणी भारतीय मानव विकास सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश घेगडे व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.