फेब्रुवारीतच वसई-विरारला पाण्याची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेब्रुवारीतच वसई-विरारला पाण्याची झळ
फेब्रुवारीतच वसई-विरारला पाण्याची झळ

फेब्रुवारीतच वसई-विरारला पाण्याची झळ

sakal_logo
By

वसई, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आतापासूनच पाण्याची झळ पोहोचू लागली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच गळतीचे वाढते प्रमाण, कमी दाब व अनियमितपणे पाणी मिळत असल्याने फेब्रुवारी ते मे महिन्याची चिंता नागरिकांना भेडसावू लागली आहे.
कोरोनाकाळापासून वसई-विरार शहर महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. अद्याप निवडणुकांचे बिगुल वाजले नाही. अशातच प्रशासनासमोर पाण्याचा प्रश्न डोके वर काढू लागला असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेला महिलांनी रस्त्यावर उतरून पाण्याची समस्या मांडली होती. विरार येथेदेखील पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. पाण्यासाठी पालिकेसमोर हंडा मोर्चा धडकला. विरार पूर्वेकडील परिसरात अनियमित पाणी मिळत असल्याने तब्बल तीन तास पालिकेत महिलांनी थांबून प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष किती जाणवत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. अनेक गृहसंकुल व सामूहिक पाण्याच्या नळजोडण्या अद्यापही मिळाल्या नाहीत. त्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागत आहे अशातच अशुद्ध पाणीपुरवठा झाला, तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नव्या योजना येणार, मुबलक साठा मिळणार, अशी ग्वाही महापालिका देत आहे. नव्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठ्याचे काम अंतिम टप्प्यात येणार असल्याने नव्या नळजोडणीचा अर्जदेखील दाखल करण्यासाठी पालिकेने आवाहन केले आहे; मात्र सद्यस्थितीत पाण्याचा ठणठणाट जाणवू लागल्याने भविष्यात येणाऱ्या योजनांपेक्षा आता पाणी द्या, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

--------------------------
जलवाहिनी फुटल्याचा परिणाम
अनेकदा धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यानंतर जलवाहिनी फुटणे, बिघाड होणे, गळती निर्माण होणे या कारणांनी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच पालिकेने प्रभागानुसार वेळापत्रक जाहीर केले आहे; परंतु कमी व अनियमित दाबाने पुरवठा होत असल्याने मुबलक पाणी मिळत नाही.

-----------
पाणी मिळत नसल्याने दैनंदिन वेळापत्रक बदलत आहे. एकीकडे पाण्यासाठी पैसे मोजतो. त्यातच पाणी आले, तर कमी दाबाने किंवा कमी वेळाकरिता मिळते. त्यामुळे मुबलक साठा उपलब्ध होत नाही.
- पूजा सिंग, महिला नागरिक

-----------
नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून त्या प्रकारे नियोजन करण्यासंबंधी पाणीपुरवठा विभागाला सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ज्या ठिकाणी पाणी अनियमित किंवा कमी दाबाने येत आहे, त्याची पाणीपुरवठा विभागाकडून पाहणी केली जाईल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त