शेतातल्या पोपटीला व्यावसायिक सुगंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतातल्या पोपटीला व्यावसायिक सुगंध
शेतातल्या पोपटीला व्यावसायिक सुगंध

शेतातल्या पोपटीला व्यावसायिक सुगंध

sakal_logo
By

महेंद्र दुसार, अलिबाग
शेताच्या बांधावर तयार होणाऱ्या पोपटीची चव एकदा घेतली की ती सहसा विसरता येत नाही. पोपटी तयार करणे हे सर्वांनाच जमते असे नाही. यात तरबेज असणाऱ्या तरुणांनी पोपटीला व्यावसायिक स्वरूप देत नवी वाट चोखंदळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या रायगड जिल्ह्यात वालाची शेती बहरत असून ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन येणाऱ्या पर्यटकांच्या आग्रहाखातर येथील हॉटेल्समधील मेनूकार्डवरही पोपटीला स्थान मिळाले आहे.

वाढत्या कृषि पर्यटनाचा वालाची पोपटी अविभाज्य भाग होत आहे. मुंबई-पुण्यातील खवय्यांना पोपटीची चटक लागली असून पोपटी पार्ट्यांचे ते आग्रह धरू लागले आहेत. फोन करायचा आणि पोपटी किती व्यक्तींसाठी करायची आहे, त्यातील पदार्थ कोणते हवेत, किती वाजता हवी आहे, इत्यादी माहिती दिल्यावर लज्जतदार पोपटी काही तासांतच तयार करून देण्याचा नवा ट्रेड विकसित होत आहे.
पोपटी शिजवणे हे मोठे कसब आहे. केवळ अंदाजाने मातीच्या मडक्यातील पोपटी शिजली आहे किंवा नाही हे सांगणे तज्ज्ञ व्यक्तींनाच जमते. अन्यथा आतील पदार्थ कच्चे किंवा जास्त करपल्याने पोपटी बेचव होण्याची शक्यता असते. यामुळे पोपटी बनविणारे देखील आता कमर्शियल होत आहेत.
शाकाहारी, मांसाहारी अशा स्वरूपात पोपटी बनविणाऱ्या कारागिरांनी येथे चांगलेच बस्तान मांडले आहे. येथील हॉटेल्स, धाब्यांवर तयार पोपटी मिळू लागली आहे. रात्री पोपटीच्या लज्जतीबरोबर कवी संमेलन, गप्पाचे फड रंगू लागले आहेत. ग्राहकांची ही नस ओळखून आपल्या शेतातच बैठकीची व्यवस्था करून ठेवल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून किंवा अलिबागकडे येताना ‘पोपटी तयार आहे’ अशा पाट्या हमखास दिसतात. साधारण फेब्रुवारी महिन्यात रायगड जिल्ह्यात वाल, पावटा यांचे मुबलक प्रमाणात पीक येते. पोपटीच्या चवीसाठी गावठी वालच चांगले असतात, असे योगेश राऊत या कारागिराचे म्हणणे आहे. यासाठीच रायगडमधील पोपटी प्रसिद्ध आहे. मुरूड, रोहा, अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनातून पोपटी पार्ट्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली असून त्‍यास पर्यटकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे


कशी करतात पोपटी?
एक मध्यम आकाराचे मडके घेऊन त्यामध्ये केळीची पाने खाली लावली जातात. नंतर तळाला भांबुर्डीचा पाला ठेवतात. त्यावर वालाच्या शेंगा, ओवा,चवीपुरते जाडे मीठ टाकले जाते. नंतर आवडीनुसार अंडी व वालाच्या शेंगा, बटाटे, भाज्या ठेवल्या जातात. नंतर आले, लसूण वाटण आणि मीठ, मसाला व हळद लावलेले चिकनचे तुकडे तेल लावलेल्या केळीच्या पानात गुंडाळतात व मडक्यात ठेवले जातात. त्यावर परत वालाच्या शेंगा अंडी ठेवून भांबुर्डीच्या पाल्याने तोंड बंद केले जाते. नंतर मडके पालथे ठेवून चुलीवर शिजवले जाते.

मेनूकार्डमध्ये पोपटीचा समावेश
काही हॉटेल्‌स वेगवेगळे मेनू तयार करून ग्राहकांचे लक्ष आकर्षित करतात. जिताडा, खेकडा, कोळंबीच्या रस्साची चव चाखण्यासाठी जसे ग्राहक येथे असतात, त्याचप्रमाणात गावठी वालाच्या पोपटीची चव चाखण्यासाठीही खवय्ये येवू लागले आहेत. पोपटीचा मेनू आता येथील मोठ्या हॉटेल्समध्येही ग्राहकांच्या आग्रहास्तव दिसू लागला आहे. आकर्षक पद्धतीने पोपटीचे फलक हॉटेल, कॉटेजेस, फार्महाऊसच्या प्रवेशद्वारावर दिसू लागले आहेत.

मागणीनुसार पुरवठा
पोपटीची किंमत त्यातील पदार्थांनुसार जास्त कमी होते. सध्या पुणे येथून येणाऱ्या शेंगापासून बनवलेली एक किलो पोपटी साधारण ३५० रुपयांपर्यंत मिळते. तर पूर्ण मडक्याची किंमत एक हजाराच्या वर जाते. मांसाहारी एका मडक्यातील पोपटीची किंमत २ हजार रुपयांपर्यंत जाते, हे सर्व दर त्यामध्ये कोणते पदार्थ टाकणार, यावरून निश्चित होते.


मांसाहारी पोपटी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, मिठ-मसाला व्यवस्थित एकत्र केल्यानंतरच भांबुर्डीच्या पाल्‍याने मडक्याचे तोंड
बंद करावे लागते, तरच पोपटी लज्जतदार आणि सुगंधी होते. ग्रुपने येणाऱ्या ग्राहकांसाठी हा पदार्थ कमी खर्चातला आणि वेगळा आनंद देणारा ठरतो. अलिकडे पोपटीबरोबर कमी आवाजातील डीजेची मागणी असते. काही हौशी ग्राहक कराओके सिस्टीमची मागणी करून स्वतःच गाणी गात करमणूक करतात. यात वेगवेगळे प्रयोग करत असताना शहरातील ग्राहक चकाचक हॉटेलमध्ये पार्ट्या करण्यापेक्षा शेताच्या बांधावर मोकळ्या वातावरणात जास्त रमत असल्याचे दिसून येत आहे.
- सुशांत पाटील, कृषी पर्यटन व्यावसायिक, रोहा