गल्ली-बोळात स्वच्छतेची चळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गल्ली-बोळात स्वच्छतेची चळवळ
गल्ली-बोळात स्वच्छतेची चळवळ

गल्ली-बोळात स्वच्छतेची चळवळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ ः स्वच्छता हा नित्यक्रम व्हावा, म्हणून नागरिकांनी स्वतःसोबतच समाजालाही स्वच्छतेची सवय लागावी याकरीता महापालिकेने अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत लोकसहभागासोबत मिळणाऱ्या अभिप्रायासाठी नाक्या नाक्यावर, गल्लीत आणि चौकांमध्ये स्वच्छतेबाबत चर्चा व्हावी, या उद्देशाने पालिकेने स्वच्छतेची चळवळ उभारली आहे. त्यात पथनाट्य, रहिवासी सोसायट्यांमध्ये प्रबोधन, तसेच अध्यात्मातून समाजप्रबोधनाची त्रिसूत्री राबवली जात आहे.
-------------------------------------
नवी मुंबईच्या शहर स्वच्छता कार्यात विविध विभागांतील नागरिकांचाही नेहमीच सहभाग व्हावा याकरिता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अनेक नागरिक समूहाने एकत्रित जमून स्वच्छतेचे विविध उपक्रम सुरू झाले आहेत. ते स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्याचे निर्देश सर्व विभाग अधिकारी व विभागांना दिले असून त्यानुसार आठही विभागांमधील स्वच्छता उपक्रमांना वेग आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग व मॅंग्रोव्हज सोल्जर यांच्या संयुक्त विद्यमाने करावे खाडी किनारा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून खारफुटीमध्ये अडकलेला, तसेच आसपासच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक कचरा तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साफ करण्यात आला. मॅंग्रोव्हज सोल्जर ही संस्था सेवाभावी वृत्तीने दर सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहिमा राबवत असून खारफुटी भागातील स्वच्छतेवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अशाच प्रकारे वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता मोहीम राबवत आहे.
--------------------------------------
पथनाट्यातून जनजागृतीवर भर
याठिकाणी कचरा वर्गीकरण, कचऱ्याची कंपोस्ट पिट्सद्वारे विल्हेवाट, प्लास्टिक प्रतिबंध अशा विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले. तसेच स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. सेक्टर ७ सानपाडा येथील सीताराम मास्तर उद्यान व परिसर गार्डन ग्रुप संस्था आणि तुर्भे विभाग कार्यालय स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून साफ करण्यात आला. तसेच सानपाडा सेक्टर ५ येथील नमुंमपा शाळा क्र. ११८ मध्ये विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती देत त्यांची स्वच्छतेविषयी मनोभूमिका तयार करण्यात आली.
----------------------------
रहिवासी सोसायट्यांमध्ये प्रबोधन
प्रत्यक्ष सोसायट्यांमध्ये जाऊन महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व त्यांचे सहकारी नागरिकांशी थेट संवाद साधत असून त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच कचऱ्याची घरात कंपोस्ट बास्केटद्वारे अथवा सोसायटीच्या आवारात कंपोस्ट पिट्सद्वारे शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची माहिती करून दिली जात आहे. वाशी विभागात सेक्टर १७ येथील चढ्ढा क्रिसेंट सोसायटी, ऐरोली येथील सेक्टर ४ मधील फ प्रभाग असोसिएशन याठिकाणी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
----------------------------
हरिनाम सप्ताहात जनजागृती
सानपाडा सेक्टर ८ येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपामध्ये ५०० हून अधिक नागरिकांशी कीर्तनाच्या मंचावरून संवाद साधत त्यांना कचरा वर्गीकरण व ओल्या कचऱ्याची कंपोस्ट पिट्सद्वारे विल्हेवाट लावण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याविषयी जनजागृती करण्यात आली. अशाच प्रकारची जनजागृती मोहीम सेक्टर ३ नेरूळ येथील जयभवानी चौकात व्यापक स्वरूपात राबवण्यात आली.
--------------------------------------
नवी मुंबई शहर स्वच्छतेत जागरूक नागरिकांचे नेहमीच सक्रिय योगदान राहिले आहे. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे, हे लक्षात घेऊन नागरिक ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यामध्ये सातत्य राहण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका