
पोलिस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
नेरळ, ता. ४ (बातमीदार) : पोलिस ठाण्यात एका प्रकरणाबाबत चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार नेरळ येथे घडला. याबाबत पोलिसांनी तत्काळ या व्यक्तीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तक्रारदार महिलेला धडा शिकवण्यासाठी आरोपीने केलेल्या या कृत्याने पोलिसांना धावपळ करावी लागल्याचे यातून समोर आले. दिलीप श्रीराम यादव याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास एक महिला नेरळ पोलिस ठाण्यात आली होती. महिलेची तक्रार पाहता पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून दिलीप याला चौकशीसाठी नेरळ पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. मात्र तक्रार नोंदवण्यापूर्वीच आरोपी यादव याने तक्रारदार महिलेस धडा शिकवण्याच्या उद्देशाने स्वत:जवळ लपवून आणलेले विषारी औषध पोलिस ठाण्यातील बाथरूममध्ये जाऊन प्राशन केले. पोलिसांनी त्याला तत्काळ नेरळ येथील धन्वंतरी हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी यादव याला सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे नेले; परंतु यादव याची प्रकृती खालावल्याने त्यास सायन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. याबाबत दिलीप यादव याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हनमंत शिंदे हे करीत आहेत.