
कोचाई गावातून दमण बनावटीचा दारू साठा जप्त
मनोर, ता. ५ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्याच्या कोचाई भागातील कोचाई-लुहारी रस्त्यावर केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पिकअप टेम्पोसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दमण बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील कोचाई भागात सापळा रचला होता. शुक्रवारी रात्री कोचाई- लुहारी रस्त्यावर एका संशयास्पद पिकअप टेम्पो चौकशीसाठी थांबवण्यात आला. पण टेम्पोचालक टेम्पो सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात १२१ बॉक्समध्ये १९९.८८ बल्क लिटर दमण बनावटीचा मद्यसाठा आढळला. याप्रकरणी मद्यसाठ्यासह पिकअप टेम्पो असा दहा लाख ८९ किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या पथकातील अधिकारी आणि जवानांनी केली.