
वंकास येथे परीक्षा पे चर्चा
कासा, ता. ६ (बातमीदार) : रोशनी फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईतर्फे वंकास आणि आंबेसरी- पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता १० वीच्या विद्यार्थांना गणित विषयाचे मोफत चर्चासत्र वंकास येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेते, गणित विषयावरील ५८ पुस्तकांचे लेखक, ८५०० चर्चासत्रांचा अनुभव असलेले गणितज्ज्ञ नारायण गव्हाणे यांनी चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल आत्मविश्वास व परीक्षेची भीती दूर करण्यात यश आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयाची जास्त भीती वाटते, ती या चर्चासत्रामुळे कमी झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दहावीच्या ११६ विद्यार्थ्यांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा गीता मृच्छाला यांनी पुढाकार घेतला.