महामार्ग परिसर विकासाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग परिसर विकासाला गती
महामार्ग परिसर विकासाला गती

महामार्ग परिसर विकासाला गती

sakal_logo
By

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील मुंबई- अहमदाबाद महामार्ग परिसरातील विकासाला लवकरच गती मिळणार आहे. या परिसरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या तसेच नाल्यांच्या कामाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ९ फेब्रुवारीला या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. एमएमआरडीएकडून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
महामार्ग परिसरातील प्रभाग १४ मध्ये लोकसंख्या दाट असून याठिकाणी चेणा, वर्सोवा, काजू पाडा, माशाचा पाडा हे आदिवासी पाडे, बैठी घरे, चाळी, तसेच झोपड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या भागात म्हणावी तशी विकासाची कामे झालेली नाहीत, तसेच मूलभूत सोयी-सुविधांचीही वानवा आहे. आजही याठिकाणी चांगले व दर्जेदार रस्ते नाहीत. त्यामुळे याठिकाणी विकासाची कामे होऊ शकलेली नाहीत. त्याचा येथील रहिवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.
या भागातील रस्त्यांसाठी निधी दिला जावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएकडून या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून प्रभाग १४ मधील सर्व प्रमुख रस्ते नवीन केले जाणार आहेत. एमएमआरडीएने रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच कामाचे कार्यादेश दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी या रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

या रस्त्यांची होणार कामे
१) नीलकमल नाका ते मनाली व्हिलेज
२) जरी मरी ते अग्रवाल ग्रीन व्हिलेज
३) राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, आर. के. इन ते अग्रवाल व्हिलेज नाला
४) पठाण चौक ते वेस्टर्न पार्क नाला
५) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. १, जरी मरी मंदिर, राज इस्टेट बिल्डींग ते हॉटेल सफारी
६) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. २, राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, साई पॅलेस हॉटेल ते मीनाक्षी नगर- आबिद कॉलेजपर्यंत ३० मिटर रुंद डीपी रस्त्याचे बांधकाम
७) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, सफारी हॉटेल ते राज इस्टेटपर्यंत डीपी रस्त्याचे बांधकाम
८) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. ४, राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ महाजनवाडी, महाविष्णू मंदिर ते साई मंदिरपर्यंत रस्त्याचे बांधकाम
९) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. ५, राष्ट्रीय महामार्ग सह्याद्री हॉटेल ते वर्सोवा गावपर्यंत रस्त्याचे बांधकाम
१०) प्रभाग क्र. १४, रस्ता क्र. ६, हिल व्ह्यू हॉटेल चेना ते जे कुमार चेना येथील दोन नाक्यांचे सुशोभिकरण तसेच पदपथ तसेच १२ मीटर व १८ मीटर रस्त्याचा विकास.