वडाळ्यातील स्कायवॉक कचऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडाळ्यातील स्कायवॉक कचऱ्यात
वडाळ्यातील स्कायवॉक कचऱ्यात

वडाळ्यातील स्कायवॉक कचऱ्यात

sakal_logo
By

वडाळा, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई, उपनगर या भागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. त्याचा वापरही पादचारी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र अनेक स्कायवॉकवर दिवसेंदिवस सुविधांचा अभाव आणि वाढीस लागलेले फेरीवाले, भिकारी, चोर, गर्दुल्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. त्यापैकीच एक असलेला वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला जोडून बांधण्यात आलेला स्कायवॉक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या स्कायवॉकवर ठीक ठिकाणी कचरा साठला आहे. परिणामी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून सर्वत्र दुर्गंधी परसरल्याने येथून प्रवास करणे प्रवाशांना गैरसोयीचे झाले आहे.
एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून वडाळा पूर्वेला जोडणारा अंदाजे ८०० मीटरचा स्कायवॉक बांधला. यामुळे वडाळा पूर्व विभागातील हजारो पादचाऱ्यांना याचा फायदा झाला. मुंबई शहरातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या स्कायवॉकमध्ये याची गणना होते. एवढा वापर असताना देखील या स्कायवॉकची देखभाल व्यवस्थित होत नसल्‍याचे दिसून येत आहे. या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरून धुळीचे थर तयार झाले आहेत. स्कायवॉकवर कचरापेटी नसल्यामुळे नागरिक येथे कुठेही कचरा टाकतात. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन स्कायवॉकवर कचरापेटी ठेवावी तसेच स्कायवॉक स्वच्छ रहावा यासाठी सफाई कर्मचारी नेमावा, अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.

सहा महिन्यांपासून स्कायवॉकची स्वच्छता वाऱ्यावर पडली आहे. स्कायवॉकवर कचरा पेटी नसल्याने सर्वत्र अस्थाव्यस्त पडलेला कचरा यामुळे स्कायवॉक विद्रुप झाला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच येथे दिवस-रात्र सुरू असलेली दिवाबत्ती दिवसा बंद करावी.
– भगवान कदम, समाजसेवक

स्‍कायवॉकच्या साफसफाईचे काम आपल्या कार्यकक्षेत येत नाही. परंतू तक्रार निवारण करण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशावरून मागील दोन दिवसांपासून दुपार पाळीत मॅनिंग मॉपिंगच्या कामगारांकडून या स्कायवॉकची साफसफाई करण्यात येत आहे.
- गाजनन बेल्लाळे, सहाय्यक आयुक्त, एफ नॉर्थ