
मानसिक स्वास्थाची काळजी घेण्यासाठी रुग्णालय प्रशासन तत्पर
नायर दंत रुग्णालयातील विद्यार्थ्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयात ८९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्व विद्यार्थ्यांच्या आणि काही प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली गरज आणि चिंताग्रस्त झटके, नैराश्याची वाढती संख्या लक्षात घेता पूर्णवेळ वैद्यकीय मानसोपरचारतज्ज्ञांची सेवा दिली जात आहे. पाच वर्षांपूर्वी रुग्णालयात आत्महत्येचे प्रकरण घडले होते. त्यानंतर, मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती व्हावी, यासाठी सातत्त्याने पाठपुरावा केला गेला. पण, आता फक्त दंत महाविद्यालयासाठी पद मंजूर होण्यासाठी ४ वर्षे लागली, असे नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता व वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
शासकीय दंत रुग्णालयांपैकी नायर दंत रुग्णालयाने पहिल्यांदाच हा पुढाकार घेतला असून प्राधान्याने मानसिक आरोग्यावर लक्ष देणारे नायर दंत रुग्णालय पहिले रुग्णालय ठरले आहे. हे मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांना समुपदेशन करणार नसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणार आहे. रुग्णालय प्रशासनाने विद्यार्थ्यांमध्ये भीती, नैराश्य आणि शैक्षणिक तडजोडी यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.