थकबाकीदारांची पाणीबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदारांची पाणीबंदी
थकबाकीदारांची पाणीबंदी

थकबाकीदारांची पाणीबंदी

sakal_logo
By

वसई, ता. ६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेला पाणीपट्टी हे उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे, पण अनेक जण पाणीपट्टी भरत नसल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत वर्षभराच्या एकूण वसुलीचे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्यानुसार थकबाकीदारांच्या नळजोडणीवर कारवाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. यात वर्षभरात एकूण ७०० नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. मोठमोठी गृहसंकुले तसेच जुन्या इमारतींना पाण्याच्या नळजोडण्या व सामूहिक नळजोडणी संख्या ५८ हजार ६०० इतकी आहे. नव्याने येणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून नवीन नळजोडण्या देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नळजोडणीत मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. मात्र पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेने नळजोडणीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
वसई-विरार महापालिकेला पाणीपट्टी वसुलीतून वर्षभरात ८९ कोटी ७८ लाख इतके उत्पन्न मिळते. सद्यस्थितीत या वसुलीचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. शहरात नव्याने पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा, जुन्या जलवाहिनीत बदल, शहरातील ७८ जलकुंभ, याचबरोबर वारंवार दुरुस्तीचे काम यासाठी पैसे खर्च करावे लागत असताना वसुली मात्र कमी स्वरूपात होत आहे.
वसुली होत नसल्याने कारवाई केली जात आहे. यासाठी नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. पाणी बंद झाल्यावर तरी कर भरण्यासाठी नागरिक धाव घेतील, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.
---------------------------
मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेच्या संबंधित विभागाने पथक तयार केले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या करदात्यांनी थकीत कर भरून महापालिकेस सहकार्य करावे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
-----------------------
वर्षभरातले उत्पन्न - ८९ कोटी ७८ लाख
पाणीपट्टी वसुली - ५४ कोटी ३० लाख
थकीत रक्कम - ३५ कोटी ७७ लाख
शहरातील नळजोडण्या - ५८ हजार ६००
५ हजार ७९० नळजोडण्यांना नोटीस
नळजोडणी खंडित - ७००
----------------------
बेकायदेशीर नळजोडण्यांवर करडी नजर
वसई-विरार शहरात अधिकृत नळजोडण्या देण्याची प्रक्रिया बंद आहे. सध्या केवळ अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अनधिकृतपणे पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोडण्या शहरात कुठे आहेत का, याची चाचपणी करून कारवाईचा बडगा उगारण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.