भारत जोडो यात्रा राहुल गांधींमुळे यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत जोडो यात्रा राहुल गांधींमुळे यशस्वी
भारत जोडो यात्रा राहुल गांधींमुळे यशस्वी

भारत जोडो यात्रा राहुल गांधींमुळे यशस्वी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : देशातील राजकीय परिस्थिती पाहता, भारत जोडो यात्रा हा आवश्‍यक उपक्रम होता. नागरिकांसाठी सकारात्मक संदेश पोहोचला असून या संधीचा काँग्रेस पक्ष कशा प्रकारे लाभ घेत पुढील निवडणुकीत लाभ घेतात, यावर पुढील निकाल अवलंबून असेल. भारत जोडो यात्रेचे सर्व श्रेय राहुल गांधी यांचे आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील जनता काँग्रेसला कशा प्रकारे सहकार्य करते, त्यावर पक्षाचे पुढील भवितव्य अवलंबून असेल, असे मत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

डोंबिवलीत हेल्पिंग हॅन्ड या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमास रविवारी (ता. ५) तुषार गांधी यांनी उपस्थिती दर्शविली होती. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भारत जोडो यात्रेविषयी मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम राबविली होती, त्याचा खरपूस समाचार तुषार गांधी यांनी घेत म्हटले की, राष्ट्रभक्तीचा हा एक दंभपणा आहे. एक दिवस घरावर तिरंगा ठेवायचा आणि त्यानंतर तिरंग्याची काय अवस्था होते, त्याकडेही कोणी पाहत नाही. त्यापेक्षा नागरिकांनी वृत्तीमध्ये, कार्यात, जीवनामध्ये आपण देशाचे हित कसे करतो, नुकसान काय करतो याची जाणीव असणे हीच प्रखर राष्ट्रभक्ती आहे, असे मला वाटते, असे ते म्हणाले.

महात्मा गांधीजींच्या फोटोला विरोध
भारतीय चलनावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नसावे, याचा त्यांनी पुनर्उच्चार केला. देशात चलनाचा ज्याप्रकारे वापर होतो, तो गांधी यांच्या तत्वाविरोधात आहे. आज पैशाचा फायदा हा केवळ श्रीमंतांना होत आहे, गरिबांना नाही. म्हणून चलनावर गांधीजींचे छायाचित्र नसावे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

देशात स्वतंत्र न्यायप्रणाली
भारतात न्यायतंत्र असेल तर अदाणी यांनी स्वतंत्रपणे विचार करून देशाच्या न्यायाप्रमाणे वागायला पाहिजे. सरकारवर केवळ टीका करण्यात काही अर्थ नाही. आपल्याकडे स्वतंत्र न्यायप्रणाली आहे, त्यांनी स्वतंत्रता दाखवण्यासाठी गुन्हे प्रवृत्ती दिसत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

अहंकाराचे पुतळ्यातून प्रदर्शन
देशात महापुरुषांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर बोलताना, त्यांनी पुतळ्याच्या राजकारणामध्ये स्वारस्य नसल्याचे म्हटले. कारण पुतळे बनवणारा आणि ते लावणारा त्यांचे अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण करत असतात. ज्यांची प्रतिमा लावली जाते, त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही, असे ते म्हणाले.

महापुरुषांबद्दल अन्याय
देशातील नागरिकांनी आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत. म्हणून दुसऱ्यांच्या महापुरुषांवर टीका करणे आणि स्वतःच्या महापुरुषांची स्तुती करणे, हे महापुरुषांबद्दल अन्याय करण्यासारखे आहे. त्याच्यात भक्तीही नाही आणि टीका करतात त्यातही काही तथ्य नाही. राजकारणी नेत्यांची ही रणनीती असून नागरी समस्यांकडे त्यांचे लक्ष नसल्याने सामान्य माणसाच्या महत्त्वाचे प्रश्नांकडे कधी लक्ष दिले नाही, असे गांधी म्हणाले.