
‘वंदे भारत’ची चाचणी यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेची पहिली ‘वन्दे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस’ मुंबईत दाखल झाल्यानंतर घाट विभागात गेल्या तीन दिवसांपासून तिची चाचणी सुरू आहे. या एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता येत्या दोन दिवसात दुसरी वन्दे भारत मुंबईत दाखल होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी या सुपरफास्ट एक्स्प्रेसची रेल्वेकडून घाट माथ्यावर चाचणी घेण्यात येत आहे. चाचणीसाठी गुरुवारी (ता. २) रात्री वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी येथे दाखल झाल्या होत्या. शनिवारपासून सीएसएमटी ते कर्जत या मार्गावर १०५ किलमीटर प्रतितास, कर्जत-लोणावळा दरम्यान ५५ किलोमीटर प्रतितास आणि लोणावळा-सोलापूर दरम्यान ११० किलोमीटर प्रतितास या वेगाने ही एक्स्प्रेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करण्यात येत आहे. ‘वंदे भारत २.०’ प्रकारातील ही सातवी रेल्वेगाडी आहे.
या एका एक्स्प्रेसची किंमत सुमारे ११० कोटी रुपये आहे. प्रवासी सुविधेसाठी अपघातरोधक कवच यंत्रणा या एक्स्प्रेसमध्ये कार्यान्वित आहे. येत्या दोन दिवसात दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
- ताशी १८० ते २०० किमी वे
- संपूर्ण डबे वातानुकूलित असणार
- जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली
- स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे
- अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- प्रत्येक डब्यात इमर्जंसी पुश बटण
- व्हॅक्युम आधारित शौचालय
- १८० डिग्री फिरणारी आसने