नावडेत वाहतूक कोंडीशी सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नावडेत वाहतूक कोंडीशी सामना
नावडेत वाहतूक कोंडीशी सामना

नावडेत वाहतूक कोंडीशी सामना

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ७ (वार्ताहर)ः अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असलेल्या पनवेल-मुंब्रा मार्गावर नावडे येथे ७० कोटी खर्च करून एमएसआरडीसीने उड्डाणपुलाचे काम केले आहे; पण या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तळोजा उद्योग क्षेत्रात येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील वाहनांसाठी तसेच नावडा गावालगत रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने नवीन उड्डाणपूल उभारला आहे. दोन वर्षांत हा पूल बांधणे अपेक्षित होते; परंतु कोरोनाकाळात असलेल्या टाळेबंदीमुळे तीन वर्षांनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे नावडे गाव व नावडा फाटा या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गेल्या पाच महिन्यांतच हा पूल डागडुजीसाठी बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीकडे येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
-------------------------------------------
कोंडीमुळे अपघातांचे सत्र
प्रशासनाच्या उद्घाटनाची वाट न पाहता १२ मे २०२२ रोजी नावडे गावातील नागरिकांनी या पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला केला; परंतु पुलाचे काम निकृष्ट केल्यामुळेच पूल डागडुजीसाठी बंद करावा लागत आहे. या पुलामुळे नावडा गाव तसेच औद्योगिक वसाहत या दोन वसाहतींना जोडणारा छेदरस्ता तयार झाला असला, तरी अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघात, वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत.
------------------------------
नावडा पुलाची मुंब्र्याकडे जाणारी मार्गिका बंद असल्याने पुलावरील सर्व वाहतूक खालून सुरू आहे. त्यामुळे कामावर जाण्याची वेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कामावर वेळेवर पोहचता येत नाही.
- सचिन सावंत, कामगार, तळोजा