
भाईंदर-श्रीवर्धन बससाठी स्वाक्षरी मोहीम
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : भाईंदर पूर्व येथील नवघर नाका येथे भाईंदर ते श्रीवर्धन एस.टी.बस पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी जवळपास ४०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी करून श्रीवर्धन एस.टी.बस सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. याकरिता एसटी महामंडळाकडे पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे. कोरोना टाळेबंदीदरम्यान बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरु करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
मिरा-भाईंदर शहरात कोकणामधील चाकरमानी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. यामध्ये भाईंदर ते रायगड मार्गे श्रीवर्धन असा प्रवास करणारे प्रवाशांची संख्या मोठी आहे. कोरोनापूर्वी भाईंदर ते श्रीवर्धन एस.टी.बस भाईंदर (पूर्व) येथून दररोज सकाळी सहा वाजता सुटत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाचा वापर करावा लागतो अथवा एसटी बससाठी बोरिवलीला जावे लागते. खासगी वाहनचालक प्रवाशांकडून भरमसाट भाडे घेत असल्यामुळे प्रवाशांना नाहक भूर्दंड बसत आहे. याकरिता भाईंदर ते श्रीवर्धन एस.टी.बस सेवा पुन्हा सुरु करण्याच्या मागणी करता स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मनसेचे सचिव अनिल रानावडे, राजन पवार, अनिल कोटकर, रवी पाष्टे, अभिषेक नांदगावकर, संजय जगताप, उमेश भिऊगडे, विजय काते, निरंजन नवले तसेच समर्थ प्रतिष्ठानच्या महिला व पुरुष पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांचा स्वाक्षरी मोहिमेत समावेश होता.