बँक खातेदारांची प्रतीक्षा कायम

बँक खातेदारांची प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : पेण अर्बंन बँक अवसानात गेल्याच्या घटनेला १३ वर्ष होत आली, तेव्हापासून बॅंकेचे पावणेदोन लाख ठेवीदार आपल्‍या ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक आंदोलने, मोर्चे करूनही ठेवीदारांना दिलासा मिळालेला नाही. आयुष्यभराची पुंजी वृद्धावस्थेत मिळत नसल्याने पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदार वैफल्यग्रस्‍त झाले असून सरकारने लक्ष न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचे पत्र ठेवीदारांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहे.
तब्बल ५९८.७२ कोटी बोगस कर्जाची वसुली करून ही रक्‍कम ठेवीदारांना परत करण्याचे आदेश २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. यासाठी विशेष कृती समितीची स्थापना करून अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते; मात्र २०१६ पासून आतापर्यंत या रकमेच्या वसुलीत फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे ठेवीदारांवर वैफल्यग्रस्त होण्याची वेळ ओढावली आहे. १३ वर्षांत पावणेदोन लाख ठेवीदारांमधील अनेक ठेवीदारांचे निधन झाले आहे. अनेक वयोवृद्धांना किमान गरजा भागवण्यासाठी आजही नोकरी-व्यवसाय करावा लागत आहे. याबाबत मळेघर येथील विठ्ठल मोकल यांनी उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पेण अर्बन बँकेचे ठेवीदार निराश झाल्‍याचे नमूद करून ठेवींची रक्‍कम लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्‍न करावे, अशी भावनिक मागणी केली आहे.


ठेवीदारांचे जगणे कठीण
२३ सप्टेंबर २०१० रोजी पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले. लेखापरिक्षण अहवालामध्ये सातत्याने ‘अ’ श्रेणी मिळवणारी ही बँक अडचणीत आली. निर्बंध घालण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठेवीदारांना कोणतीच माहिती नसल्याने पावणेदोन लाख ठेवीदारांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, ठेवीदारांच्या ठेवींचा आणि बँक घोटाळ्याचा तिढा काही सुटलेला नाही. लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेले ठेवीदार तर हलाखीचे जीवन जगत आहेत. आज ना उद्या आपले पैसे परत मिळतील, या आशेवर आला दिवस ढकलत आहेत. उसनवारी करून दैनंदिन गरजा भागवत आहेत.
---
आश्वासनापलीकडे काहीच नाही
न्यायालयीन लढाईबरोबरच या प्रकरणाचा ठेवीदारांकडून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आजवर अनेक आंदोलने करण्यात आली आहे. पण आश्वासनापलीकडे हाती फारसे काही लागले नाही. बँकेच्या थकीत कर्जाची वसुली होताना दिसत नाही. जप्त केलेल्या मालमत्तांच्या विक्रीलाही गती मिळालेली नाही. बुडालेल्या पैशातून पनवेल, पेण, पाली, रोहा, राजस्थान इथे ज्या जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत, त्या विकून ठेवीदारांचे पैसे सहज परत करता येऊ शकतात, परंतु ही प्रक्रियाही संथगतीने सुरू आहे.
---
ठेवीदारांचे कष्टाचे रक्कम गेली कुठे?
शिशिर धारकर यांच्या कारकिर्दीत बँकेने धारकर यांच्याकडे कामाला असलेल्या समीरा शेख व त्यांच्या नातेवाइकांना सुमारे ५० कोटींचे विनातारण कर्ज दिले. त्याचप्रमाणे अशोक शहा व कुटुंबीय तसेच शैलेश देशपांडे यांच्या नावे कर्ज व जामिनाची अशी अनेक प्रकरणे बनवून ३४२ कोटींची विनातारण कर्ज दिले. या रकमेपैकी केवळ ४० कोटींची मालमत्ता खरेदी करण्यात आली व उर्वरित ३०० कोटींचे काय झाले? ठेवीदारांच्या कष्टाची रक्कम कुठे गेली? असा सवाल ठेवीदार विचारत आहेत.
---
पेण अर्बन घोटाळ्याची व्याप्ती
बोगस कर्ज प्रकरणे - ११९
घोटाळ्याची रक्कम - ७३४ कोटी
बँकेचे खातेदार- १,९३, ६४१
बँकेच्या शाखा- १८
एकूण ठेवी- ६३२ कोटी ५० लाख
ठेवीदारांना मिळालेली रक्‍कम - ७ टक्के


पेण अर्बन बँकेतील अनेक ठेवीदार वैफल्‍यग्रस्‍त आहेत. या
प्रकरणावर वेळेत निर्णय न झाल्यास या ठेवीदारांना थोपवणे कठीण जाणार आहे. याची कल्पना विशेष कृती समितीचे अध्यक्ष या नात्याने रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. २०१६ पासून समितीने फारसे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे ठेवीदारांवर ही परिस्थिती ओढावली आहे.
- नरेन जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बॅंक ठेवीदार संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com