
कर्करोगग्रस्तांच्या शूश्रुषेतील अंतर कमी करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : इंडियन कॅन्सर सोसायटीने (आयसीएस) कर्करोग, प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महिनाभर चालणारी मोहीम सुरू केली आहे. कर्करोगग्रस्तांच्या शुश्रूषेतील अंतर कमी करणे, या जागतिक कर्करोग दिन २०२३ च्या संकल्पनेचा एक भाग म्हणून आयसीएसने वोक्हार्ट फाऊंडेशनशी सहकार्य केले आहे. पुढील तीन महिन्यांत तोंडाच्या कर्करोगासंदर्भात एक लाख जणांची तपासणी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या तपासणीसाठी २०० मोबाईल व्हॅनचा वापर करण्यात येईल. तपासणीसाठी एक चित्रपट प्रदर्शित केला जाईल. कर्करोग संशोधन, उपचार आणि नियंत्रण यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हादेखील उद्देश आहे. या निमित्ताने पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज आयसीएस परळच्या आवारात एका तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. तिथे तोंड, स्तन आणि सर्व्हिकल यांसारख्या सामान्य कर्करोगांसाठी स्थानिक रहिवाशांची तपासणी करण्यात आली. या वेळी फणसळकर म्हणाले की, ‘कर्करोग तपासणीची चाचणी कर्करोगापूर्वीची स्थिती शोधण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. लवकर व वेळेवर निदान झाल्यास उपचार मिळू शकतात.’
...
आजाराचा लवकर शोध
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय विश्वस्त उषा थोरात म्हणाल्या की, ‘आपल्या देशातील कर्करोगाच्या वाढत्या घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा भावनिक आणि आर्थिक भार पडतो. तपासणीचा उपक्रम हा कर्करोगाचा लवकर शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे कर्करोगातून बचावण्याची आणि उपचाराचा खर्च कमी होण्याची शक्यता वाढेल.