
गिरणी कामगारांचे उद्या ठिय्या आंदोलन
वडाळा, ता. ७ (बातमीदार) : एनटीसी गिरण्या पूर्ववत करण्याचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालला आहे. कामगारांना ५० पन्नास टक्के मिळणारे वेतनही गेल्या पाच महिन्यांपासून मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुंबईतील चार तर राज्यातील बार्शी, अचलपूर येथील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनटीसीच्या सहा गिरण्यांतील कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कामगारांच्या या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
संघटनेचे व राष्ट्रीय समन्वय कृती समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत अनेक आंदोलने छेडण्यात आली. निवेदनाद्वारे केंद्र सरकारचे लक्षही वेधण्यात आले आहे; परंतु केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे काळाचौकी येथील इंडिया यूनायटेड मिल क्र. ५, लोअर परेल येथील पोदार, परेल येथील टाटा आणि लालबाग येथील दिग्विजय मिलमधील कामगार राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी, एकाच वेळी आपापल्या गिरण्यांवर येत्या गुरुवारी सकाळी १० पासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. कामगारांचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.