अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष
शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश

मुंबई, ता. ७ ः अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार (वय ८२) यांचे आज कोकणातून परत येताना संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे नेते अशी त्यांची ओळख असली, तरी बहुजनांची नेहमी बाजू घेणारे, अशीही त्यांची ख्याती होती.

‘रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरम’च्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून तेथे गेले होते. आज संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परिसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश हे मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मताचे ते होते. त्यासाठी त्यांनी या वयातही आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इरादा त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरू असून त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते व सक्रिय सहभाग घेतला होता. मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्यामुळे ते सतत विवंचनेत होते; मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरू केले होते. कट्टर मराठा नेते असले, तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी महापुरुषांबाबत अनुद्‍गार काढल्यामुळे वादंग झाला होता. त्या वेळीही त्यांनी निषेध करताना सर्व जातींसंदर्भात समतोल भूमिका घेतली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.
----
विविध उपक्रमात अग्रेसर
शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले; मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी उपाध्यक्ष म्हणून १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते.
---
मराठा उद्योजकांसाठी पुढाकार
वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारूपाला आणली. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम या संस्थेचा पसाराही त्यांनीच वाढविला. देशभरातील क्षत्रियांच्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. त्यांनी गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना करून त्यामार्फतही शैक्षणिक कार्य केले होते. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com