वसई विरारमध्ये १७२ प्रजातीचे पक्षीवैभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरारमध्ये १७२ प्रजातीचे पक्षीवैभव
वसई विरारमध्ये १७२ प्रजातीचे पक्षीवैभव

वसई विरारमध्ये १७२ प्रजातीचे पक्षीवैभव

sakal_logo
By

वसई, ता. ९ (बातमीदार) : वसई विरार शहर महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील पक्षीगणना पूर्ण केल्यानंतर वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षीवैभव असल्याचे समोर आले आहे. यात सातासमुद्रापार असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक अशा एकूण १७२ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा अधिवास असणाऱ्या जागा सुरक्षित राहाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यात येणार आहेत.
आशियाई पाणपक्षी गणनेचा उपक्रम नुकताच वसई-विरार महापालिकेकडून राबवण्यात आला होता. यात पालिकेचे उपायुक्त डॉ. सागर घोलप, बीएनएचएस आणि नेस्ट या दोन पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून नंदकिशोर दुधे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. एकीकडे शहरीकरणाने पक्षांचा अधिवास धोक्यात येत असताना महापालिकेने मिठागर, मोकळ्या जागा, डोंगराळ भाग यासह पाणथळ अशा एकूण २२ ठिकाणी पक्षीनिरीक्षण केले. यावेळी परदेशातून स्थलांतरित होणारे पक्षांसह पूर्वापार अधिवास असणारे पक्षी आदींची पाहणी करण्यात आली. त्यामुळे वसई विरार शहराला लाभलेले पक्षीवैभव समोर आले आहे.
सोपारा, निर्मळ, पापाखिंड, नाळे, कळंब, राजोडी, भुईगाव, नारंगी, टेभी यासह वसई विरार शहरात हंस, बदक, कबुतर, फ्लेमिंगो, ग्रे हेरॉन, व्हाईट ब्रेस्टेड वॉटरमन, बदक, खंड्या, पाणकावळे, जांभळी, पाणकोंबडी, फटाकडी, कोतवाल, शंकर, वंचक, रंगीत करकोचा, लांब शेपटीचा खाटीक, शेकाटे, करकोचे, चिमण्या, बगळे यासह अन्य प्रजातीचे दर्शन झाले.
---------------------
वसई विरार महापालिका क्षेत्रात पक्षांचा अधिवास शोधण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोहीम हाती घेतली आहे. त्यात बावीस ठिकाणे निश्चित केली होती. या पाहणीत विविध प्रजातीचे पक्षी आढळून आले. त्यांचे रक्षण करता यावे म्हणून पुढील प्रयत्न केले जाणार आहेत.
- डॉ. सागर घोलप, उपायुक्त
--------------------
वसई : पक्षीगणनेत ज्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला त्यांना पक्षीजगत पुस्तक तसेच प्रमाणपत्र देऊन वसई विरार महापालिकेकडून गौरविण्यात आले आहे.