
नैनाविरोधात भूमिपूत्रांचा एल्गार
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : सिडकोची एजन्सी असणाऱ्या नैना प्रकल्पाविरोधात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱ्या नैना प्रकल्पाविरोधात १२ फेब्रुवारीपासून ‘साखळी गाव बंद’ आंदोलन केले जाणार आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरणमधील २७० पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित केली गेली आहेत. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्याच्या प्रयत्नात सिडकोकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मलिदा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. भूमीधारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहीत करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा डाव उधळण्याकरता समितीने कंबर कसली आहे. नैना प्रकल्पबाधित गावांपैकी रोज एक गाव बंद करण्याचा इशारा सिडकोला देण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण घरात, नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीच्या वतीने अॅड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके यांची उपस्थिती होती.
-----------------------------------
गावोगावी बैठका सुरू
या आंदोलनाच्या अनुषंगाने गावोगावी बैठका सुरू झाल्या असून कुणाचीही आबाळ होऊ नये, या उद्देशाने सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी विक्री सुरू राहणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार या दरम्यान गावातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून नैनाविरोधात प्रबोधन केले जाणार आहे. तसेच सिडकोच्या गल्लाभरू वृत्तीबाबत ग्रामस्थांना अवगत करणे, हा या आंदोलनामागचा मूळ हेतू आहे.
--------------------------
शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वसाधारणपणे आंदोलन केले. मोर्चा काढला की त्यावेळी आश्वासन दिले जाते. त्यानंतर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे २३ गावांचे व्यवहार बंद करून शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करणार आहोत.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप