
झोपलेल्या सरकारला जागे करू : सचिन अहिर
वडाळा, ता. ९ (बातमीदार) : बंद एनटीसी गिरण्या, गिरण्यांच्या चाळींची पुनर्बांधणी आदी प्रश्नावर येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशन काळात गिरणी कामगारांचा भव्य लाँग मार्च काढून झोपलेल्या सरकारला जाग आणली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी दिली. टाटा मिल कामगारांच्या आक्रोश आंदोलनात ते बोलत होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे गुरुवारी (ता.९) काळाचौकी येथील इंदूकर, एन. एम. जोशी मार्गावरील पोदार, लालबाग येथील दिग्विजय आणि दादर येथील टाटा या बंद एनटीसी गिरण्यांवर संतप्त कामगारांनी हल्लाबोल आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. राज्यातील एनटीसीच्या बंद असलेल्या बार्शी, अचलपूर गिरण्यांवरही कामगारांनी सरकारविरोधात आवाज उठवला. या वेळी संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदींनी गिरण्यांवरील आंदोलने यशस्वी केली. या वेळी एम. पी. पाटील, दीपक राणे, प्रकाश भोसले, बबन आस्वले, मनोहर देसाई, नामदेव झेंडे आदी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा समाचार घेताना अहिर म्हणाले, की देशातील बंद २३ एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर माझ्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समन्वय कृती समिती गठीत करून राष्ट्रीय स्तरावर आंदोलन छेडण्यात आली आहेत. सीपीएम, आयटक, डीएमके, शिवसेनेसह विविध पक्षांच्या शिष्टमंडळाद्वारे तसेच खासदारांद्वारे या प्रश्नावर आवाज उठविण्यात आला आहे; परंतु उद्योग चालविणे हा आमचा धंदा नाही, असे केंद्र सरकार म्हणते. मग देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यापूर्वी मुंबईतील बंद खासगी गिरण्या ताब्यात घेऊन एनटीसीद्वारे कशा चालविल्या, असाही प्रश्नही अहिर यांनी या वेळी उपस्थित केला.
गिरण्यांच्या चाळींचे योग्य प्रकारे पुनर्वसन होत असेल तर आम्ही निश्चितच स्वागतच करू; मात्र या प्रश्नावर केवळ पोकळ घोषणा करणे म्हणजे बंद एनटीसी मिल कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे आणि एकप्रकारे लक्ष विचलित करून गिरण्यांच्या जमिनी अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा केंद्राचा डाव आहे.
- सचिन अहिर, आमदार तथा अध्यक्ष,
राष्ट्रीय मिल मजदूर संघ