
निर्देशांकांत पाव टक्के घसरण
मुंबई, ता. १० : जागतिक शेअर बाजारांमधील प्रतिकूल वातावरणामुळे आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांच्या निर्देशांकांमध्ये सुमारे पाव टक्का घसरण झाली. त्यामुळे कालच्या दिवशी मिळालेला नफा आज पूर्णपणे धुऊन निघाला. आज सेन्सेक्स १२३.५२ अंश, तर निफ्टी ३६.९५ अंश घसरला.
आज बीएससी व एनएससीवरील व्यवहार तोटा दाखवतच सुरू झाले, त्यानंतर दिवसभर बाजारात चढ-उतार होत होते. आजही सेन्सेक्स ६१ हजारांच्या जवळपास जाऊ शकला नाही. शेवटच्या दोन तासांत बांधकाम व्यवसाय व अन्य काही क्षेत्रांच्या शेअरमध्ये खरेदी झाल्यामुळे तोटा मर्यादित राहिला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,६८२.७० अंशांवर, तर निफ्टी १७,८५६.६० अंशावर स्थिरावला.
आज धातू निर्मिती कंपन्या, ऊर्जा निर्मिती कंपन्या, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्या, आयटी आणि एफएमसीजी क्षेत्राच्या शेअरमध्ये विक्री झाली. बँक ऑफ बडोदाचा समावेश एमएससीआय ग्लोबल स्टॅंडर्ड इंडेक्समध्ये झाल्यामुळे आज सरकारी बँकांच्या शेअरमध्ये खरेदी झाली, तर आता बहुतांशी प्रमुख कंपन्यांचे निकालही जाहीर झाल्यामुळे शेअरबाजार चांगल्या संकेतांच्या शोधात असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार व्यक्त करीत होते.
आज निफ्टीमधील अदाणी एंटरप्राइज चार टक्के, एचसीएल टेक व हिंदाल्को अडीच टक्के, टाटा स्टील दोन टक्के, तर कोल इंडिया दीड टक्के घसरला. टाटा मोटर्स, युपीएल, सिप्ला, हिरो मोटर कॉर्प, एल अँड टी या शेअर्सचे भाव एक ते दीड टक्का वाढले. बीएसईवर आज अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी ट्रान्समिशन, टाटा टेली सर्विसेस या शेअरचे भाव वर्षभराच्या नीचांकी स्तरावर गेले; तर ब्रिटानिया, महिंद्र आणि महिंद्र फायनान्शिअल सर्विसेस या शेअरचे भाव वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर गेले.