
पोलिस चौकीचेही सुशोभीकरण व्हावे!
मुंबई, ता. १० : शतकपूर्तीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसराचे महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासोबत येथील पोलिस चौकीचीही नव्याने बांधणी केली जावी, अशी मागणी मुंबई पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या
गेट वे ऑफ इंडिया परिसरातील सुभोभीकरणाची कामे विविध टप्प्यात करण्यात येणार आहेत. या कामासाठी विविध यंत्रणा एकत्र येऊन काम करत आहेत. त्यामध्ये पर्यटन मंत्रालय, मॅरिटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई महापालिका यांसारख्या संस्थांचा सहभाग आहे. याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत गेट वे ऑफ इंडिया सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार वास्तुविशारद आभा लांबा यांनी सुशोभीकरणाचा आराखडा महापालिकेकडे सादर दिला. या आराखड्यानुसार निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदाराकडून कामाला सुरुवात होत आहे. दरम्यान, आता मुंबई पोलिसांकडून या परिसरातील चौकीच्या सुधारणेचा प्रस्ताव आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात नेहमीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केल्यानंतरच पर्यटकांना वास्तूच्या परिसरात प्रवेश दिला जातो. त्यानुसार पोलिस चौकीचेही सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुंबई पोलिसांकडून मागणी करण्यात आली आहे.