
दिव्याचे सहायक आयुक्त निलंबित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला. अशातच अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणे दिव्यातील सहायक आयुक्तांना चांगलेच भोवले आहे. बेकायदा बांधकामांना पाठीशी घातल्याप्रकरणी सहायक आयुक्त फारुक शेख यांच्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवरून मागील अनेक वर्षांपासून सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून रान उठविण्यात आले होते; तर पालिका प्रशासनाला धारेवर धरत जाबदेखील विचारण्यात आला होता. त्या वेळी प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई करण्यात आली होती; तर अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून महासभेत झालेल्या चर्चेनंतर आजी, माजी सहायक आयुक्तांची चौकशीदेखील लावण्यात आली होती. सहायक आयुक्तांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामे झाली असतील, त्यांची चौकशी करून कारवाई करावी, असा ठरावही झाला होता. त्यानंतर मागील वर्षभरापासून या सहायक आयुक्तांची चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप कारवाई झालेली नव्हती.
अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महापालिकेचा अतिक्रमणविरोधी विभागाने कळवा, मुंब्रा, दिव्यासह शहरातील प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. तसेच यासाठी उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली आहे. अखेर दिव्याचे सहायक आयुक्त फारुक शेख यांच्यावर कारवाईची तलवार उगारली गेली आहे.
महापालिका मुख्यालयासमोर पोस्टर
मुंब्य्राचे सहायक आयुक्तांचे मागील महिन्यात महापालिका मुख्यालयासमोर पोस्टर लागले होते. त्यात मुंब्य्रातील अनधिकृत बांधकामांची यादी दाखवून त्यांना टार्गेट करण्यात आले होते; तर कळव्याचे सहायक आयुक्तदेखील अनधिकृत बांधकामांना वाचविण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप आमदार आव्हाड यांनी केला होता; परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट दिव्याच्या सहायक आयुक्तांवर कारवाई करण्यात आल्याने शहरात मात्र उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.