सकाळ समुहातर्फे  विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास शिबिराचे आयोजन

सकाळ समुहातर्फे विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास शिबिराचे आयोजन

विद्यार्थी रमले योगाभ्‍यासात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः समाजातील सर्व वयोगटांसाठी सूर्यनमस्कार उपयुक्त असा व्यायामप्रकार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीवर जाणे, उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमविणे आणि काही काळ आराम करण्याच्या पलीकडे सामान्‍य व्‍यक्‍ती काही करत नसल्याचे पाहायला मिळते. वास्तविक लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय बाळगल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते. त्याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने १० आणि ११ फेब्रुवारी असे दोन दिवस मुंबईतील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यासाचे विशेष शिबिर आयोजित केले होते. त्याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला.

पाटकर विद्यालयात मुलांमध्‍ये उत्‍साह
‘सकाळ’ समूहाच्या वतीने शुक्रवारी (ता. १०) दादरमधील आयएएस पाटकर गुरुजी विद्यालयात योगाभ्‍यास वर्ग पार पडले. शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. प्रामुख्याने तिसरी व चौथीच्या ७० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपक्रमात भाग घेतला. मीनाक्षी कनागले आणि ज्येष्ठ शिक्षिका शोभना हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. कार्यक्रमादरम्यान ‘सकाळ स्वास्थ्यम स्पर्धे’विषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराची सवय लागल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येईल व आपले भावी आयुष्य स्वास्‍थ्‍य ठेवून जगता येईल. ‘सकाळ’ समूहाचा हा स्तुत्य उपक्रम आमच्या शाळेत राबवला गेला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
- शोभना हेगडे, ज्येष्ठ शिक्षिका, पाटकर गुरुजी विद्यालय

शारदाश्रम विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग
दादर येथील शारदाश्रम विद्यालयात शुक्रवारी (ता. १०) ‘सकाळ’तर्फे योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील ११० विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमधील उत्साह वाखण्याजोगा होता. मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यासाठी आहाराबरोबर व्यायामाची गरज असते. व्यायामामुळे शरीर निरोगी राहते. त्याबरोबर मनाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा संदेश शिबिराद्वारे देण्यात आला.

सूर्यनमस्कार व्यायाम प्रकार सर्व वयोगटांतील व्यक्ती सहजपणे करू शकतात. पूर्ण शरीराला व्यायाम होतो. आरोग्याचे महत्त्व ‘सकाळ’ समूहाने ओळखून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन केल्‍याबद्दल त्‍यांचे आभार.
- दीप्ती इंदुलकर, मुख्याध्यापिका, शारदाश्रम विद्यामंदिर, मराठी प्राथमिक विभाग

विक्रोळीच्या शाळेत उत्तम प्रतिसाद
‘सकाळ माध्यम समूहा’च्या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाला विक्रोळीच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या शाळेतील ५०० विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक सचिन मटाले यांनी विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. कार्यक्रमादरम्यान ‘सकाळ स्वास्थ्यम स्पर्धे’विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजयकुमार चोपडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल इंदुलकर यांनी केले.

उपक्रमात संस्थेच्या प्रतिभा दशरथ बटा प्राथमिक विद्यालय, कमल वासुदेव वायकोळे इंग्लिश स्कूल आणि दशरथ अर्जुन बटा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक जयदास शेळके, अवधेश फाटक, मनस्वी कोयंडे आणि भिवा येजरे यांनी सहकार्य केले.

मुले जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत आहेत. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश केला पाहिजे. त्यामुळे मुलांचे मानसिक स्थैर्य वाढते, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. सूर्यनमस्कारामुळे मन शांत होते आणि एकाग्रता सुधारते याची माहिती ‘सकाळ’च्या सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमामुळे झाली.
- भिवा येजरे, मुख्याध्यापक, दशरथ अर्जुन बटा माध्यमिक विद्यालय

सूर्यनमस्कार व प्राणायामामुळे अभ्यास स्मरणात राहण्यासाठी मदत होते. ‘सकाळ’चा उपक्रम कौतुकास्पद आहे.
- रितिका मधुकर डोंगरे, विद्यार्थी

सूर्यनमस्कार स्नायूंसाठी उत्तम व्यायाम आहे. शरीराला शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते. मानसिक स्थैर्य वाढते.
- सार्थक सुर्वे, विद्यार्थी

‘सकाळ’तर्फे आयोजित योग शिबिरात सहभाग घेऊन खूप आनंद झाला. बॅरिस्टर नाथ पै शाळेच्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. सूर्यनमस्कार शिकण्याचा विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आमच्यासारख्या प्रशिक्षकांमध्येही हुरूप येतो.
- सचिन मटाले,
आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक

स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्‍ये उत्‍साह
मालाड (बातमीदार) ः ‘सकाळ’ समूहाच्या वतीने आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाला दहिसरच्या स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुडे, शिक्षक राकेश पाटील, मानसी निर्मळ, मंजुषा कुवर, संध्या दुबे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाले होते.

नंदादीप विद्यालयात योगाचे धडे
मालाड (बातमीदार) ः ‘सकाळ’ने आयोजित केलेल्‍या सामूहिक सूर्यनमस्‍कार उपक्रमात गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयातील विद्यार्थी वर्गाने उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. सुनीता घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक अर्जुन जगधने, पर्यवेक्षक जयसिंग राजगे, समन्वयक राजश्री साळगे आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. उपक्रमादरम्यान अनेक कवायत प्रकार आणि समूहगीतही घेण्यात आले. एनएमएमएस परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही करण्यात आले. मुख्याध्यापकांनी मुलांना स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असतो. आताही ‘स्वास्थ्यम’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य वृद्धीसाठी अतिशय फायदेशीर ठरेल, अशी खात्री आहे.
- अर्जुन जगधने, मुख्याध्यापक, नंदादीप विद्यालय

‘सकाळ’ची स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेची संकल्पना अतिशय उत्तम आहे. या स्पर्धेचा आम्हा विद्यार्थ्यांना तसेच आमच्या पालकांना नक्कीच उपयोग होईल. स्पर्धेच्या माध्यमातून का होईना; पण मुले वर्तमानपत्र वाचू लागतील. त्यांना रोज नवनवीन माहिती मिळेल व याच माहितीच्या आधारे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
- श्रेया समनाक, विद्यार्थिनी

ओम मंत्रोच्चारात विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार
प्रभादेवी (बातमीदार) : विद्यार्थ्यांसह कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत वरळी येथील शिक्षण विकास समूहाच्या मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओमच्या मंत्रोच्चारात शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार घातले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या सभागृहात योग शिक्षिका राजकन्या आर्या यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने सामूहिक सूर्यनमस्कार घातले.
‘सकाळ’च्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘स्वास्थ्यम’ या खास सदर व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याची सुरुवात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराने केली. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्यासाठी शिक्षक भास्कर आर्या यांनी विद्यार्थ्यांना सुमधुर भजन गायला लावले. योग शिक्षिका राजकन्या आर्या व क्रीडा प्रशिक्षक अमेय म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कराचे महत्त्व सांगितले. ‘स्वास्थ्यम’ सदर व प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. यासाठी शिक्षण विकास समूहाचे इंग्रजी मध्यमाचे मुख्यध्यापक हनुमान पदमुख यांचे सहकार्य लाभले.

एम. एस. के प्राथमिक विद्यालयात योगाभ्‍यास
चेंबूर, ता. ११ (बातमीदार) ः धकधकीच्या जीवनात विद्यार्थी व पालकांना व्यायामाची सवय लागावी याकरिता ‘सकाळ स्वास्थ्यम’ अंतर्गत चुनाभट्टी येथील एम. एस. के प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व भुजंग आसनाचे धडे देण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्‍येने सहभाग घेतला होता. उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षक भरत पाटील यांनी सूर्यनमस्कार कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाला संचालिका प्रमिला गोस्वामी, कोषाध्यक्ष प्रणीता भारती व मुख्याध्यापिका सविता सरमळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com