कागदी पिशव्यांचा २५ वर्षांचा प्रवास

कागदी पिशव्यांचा २५ वर्षांचा प्रवास

अभय आपटे, रेवदंडा
अलिबाग तालुक्यातील चौल-चंपावती आळीतील निसर्ग व पर्यावरणप्रेमी शैलेश राईलकर (वय ४८) यांची नेहमी धडपड चालू असते. त्यात पर्यावरणाशी मैत्री आणि रोजगाराची संधी या दोन गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न असतो. पूर्वी शहरी भागात प्लास्टिक कचरा ही समस्या गंभीर होती. पण आता ग्रामीण भागातही हेच चित्र दिसत आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कागदी पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. यासाठी सुमारे २५ वर्षांचा प्रवास त्यांनी आजही सुरू ठेवला आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, घराबाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन खरेदी करा, अशा जाहिराती सगळीकडे झळकतात. विविध प्रकारे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती मोहीम आखल्या जात आहेत. विविध उत्सव, सणांमध्ये निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांत भरून खाडी, नदीत टाकले जाते. या पिशव्या जलचर प्राण्यांना किती घातक आहेत, हे रोज ऐकत आहोत. कचरा कुंडीत तर प्लास्टिक कचरा विचारायला नको. यावर पर्यावरण रक्षण करणारी मंडळी काहीना काहीतरी प्रयोग करत असतात. अलिबाग तालुक्यातील राईलकर यांनी वर्तमानपत्राच्या कागदापासून आकर्षक अशा विविध आकाराच्या पिशव्या बनवत आहेत.
वर्तमानपत्राचे दोन अखंड कागद एकावर एक ठेवून त्यावरील घडीवर पत्र्याचे छोटे आयलेट बसवून हॅडलसाठी (पिशवीच्या बंदासाठी) सुतळीचा धागा वापरला जातो. कागदांच्या घड्यांवर शिलाई करण्यात येते. या पिशव्यांमध्ये ओल्या वस्तू नेता येत नाहीत. मात्र, बेकरी उत्पादने, खेळणी, पुस्तके, इस्त्रीचे कपडे, फरसाणसारखे खाद्य पदार्थ, अशा हलक्या वस्तूंची ने-आण करता येते. या बनवलेल्या पिशव्या बेकरीसारख्या ठिकाणी विक्रीला जातात. अनेक औषध दुकानात गोळ्यांची पाकिटे देण्यासाठी वापरल्या जातात.

पुठ्यांचे बास्केट
साधारण कांदे-बटाटे, भाज्या आणण्यासाठी राईलकर यांनी पुठ्ठ्याचे खोके घेऊन त्यांना सुतळीचा फास दोनदा घेऊन छोटे बास्केट तयार केलेले आहेत. त्यांनी याबाबत अनेकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. सकाळ वर्तमानपत्राच्या तनिष्कांनाही त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.

झोळा पिशवी
जागेअभावी शहरी किंवा ग्रामीण भागातील नागरिक बादलीत काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्या लावतात. कचरा भरल्यावर त्या पिशव्या गावातील मोकळ्या जागेत फेकून देतात. यामध्ये परिसर अस्वच्छ दिसतोच; शिवाय दुर्गंधी व रोगराई पसरू शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे जागा आहे किंवा बागायती आहे त्यांनी घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठवायचा. अन्य कचरा घरातील बादलीत कागदी झोळा पिशवीत जमा करायचा आणि मग तीच पिशवी खड्ड्यात टाकायची जेणेकरून काही दिवसात माती होईल. यासाठी राईलकर यांनी वर्तमान पत्राच्या रद्दीतून झोळा पिशवी तयार केली आहे. या पिशव्यांना पण आता मागणी आहे.

पिशव्यांचा दर
साधारण पिशव्या बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पेपर रद्दी, सुतळी या गोष्टी महाग झाल्या आहेत. तरी मोठ्या हॅन्डलवाली पिशवी चार रुपये घाऊक दरात मिळत आहे. तर कचरा टाकण्यासाठी बनवलेली झबला पिशवी सहा ते सात रुपये घाऊक दराने मिळत आहेत. पिशव्या बनवणाऱ्या महिलांना हजार पिशव्यांच्या मागे ६०० रुपये मोबदला मिळतो.

गावकऱ्यांचा हातभार
गावातील काही जण पर्यावरण रक्षणाचे चांगले काम होत असल्याने कमी दरात पेपर रद्दी देतात. तर काही ज्येष्ठ महिला हा उपक्रम चालू राहावा, यासाठी मोफत पेपर रद्दी देतात, अशी माहिती शैलेश राईलकर दिली.

कागदी पिशव्या घरचे काम सांभाळून बनवता येत असल्याने पर्यावरण मित्र बनता आले. त्यातून आर्थिक मूल्य किती मिळते याचा विचार मनात येत नाही.
- सुस्मिता मयेकर, चौल-मल्लेश्वर

कागदी पिशव्या बनवण्याच्या कामातून घरखर्चाला हातभार लागतोच; पण मनाला काहीतरी वेगळे केल्याचा आनंद मिळतो.
पवित्रा श्रावंदे, चौल चंपावती आळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com