लहान विद्यापीठांतून गुणवत्तावाढीला प्रोत्साहन

लहान विद्यापीठांतून गुणवत्तावाढीला प्रोत्साहन

मुंबई, ता. ११ : लहान विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक विकास व गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे अधिक सुलभ असल्यामुळे केंद्र सरकार त्यांच्या स्थापनेला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे मुंबईतील तीन नामांकित महाविद्यालयांचा समावेश असलेल्या एचएसएनसी (हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट) समूह विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम ''सेंटर ऑफ एक्सलन्स'' होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

एचएसएनसी समूह राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. ११) मुंबई येथील के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारोहाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ, तसेच जागतिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. एकेकाळी भारतातील नालंदा, तक्षशिला आदी नामांकित विद्यापीठांमध्ये जगभरातील विद्यार्थी शिकायला येत होते. यानंतर पुनश्च विदेशातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजे, असे नमूद करून विद्यार्थ्यांनी नवसंशोधन, उद्यमशीलता यांना उत्तम चारित्र्याची जोड देऊन देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी स्नातकांना संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध, सुशासित, सुरक्षित, स्वानंदी, तसेच जातीविरहित भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील १५ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक, तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक एम. एन. जस्टीन, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, स्नातक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com