बदलापुरात आठवडा बाजारानंतर कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात आठवडा बाजारानंतर कचऱ्याचे ढीग
बदलापुरात आठवडा बाजारानंतर कचऱ्याचे ढीग

बदलापुरात आठवडा बाजारानंतर कचऱ्याचे ढीग

sakal_logo
By

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : शहरात शहरीकरणाचा वेग प्रचंड असून, अगदी शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी बांधकामे उभी राहत आहेत. नवनवीन वस्ती उदयास येत असून, स्टेशनपासून दूरवरच्या अंतरावर असलेल्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या आठवडा बाजार भरवले जात आहेत. बाजार झाल्‍यानंतर मात्र योग्य निगा न राखल्‍याने या ठिकाणी घाण, कचरा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील विविध प्रश्न उभे राहत आहेत.

बदलापूर शहरात मांजर्ली, वालीवली, बदलापूर गाव, कात्रप अशा अनेक ठिकाणी प्रशासनाच्या परवानगीशिवाय आठवडा बाजार भरत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या पालिकेच्या किंवा खासगी जागांवर, मैदानासारख्या ठिकाणी हे बाजार भरत असून, यासाठी त्या त्या विभागातील स्थानिक पुढाऱ्यांचा वरदहस्त बाजारांवर असल्याचे काही नागरिक सांगतात. या बाजारात अगदी घरातील वापराच्या वस्तू, जिन्नस, खाद्यपदार्थ, कपडे, व भौतिक सुख सोयी पुरवणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून, अनेक विक्रेते येतात. मात्र, कचरा, आरोग्याच्या तक्रारी, सुरक्षेच्या तक्रारीमुळे पालिका प्रशासनाने यापूर्वीच हे बाजार बंद केले आहेत. मात्र आता पालिकेची परवानगी नसतानाही आता शहरात सर्रासपणे भरणाऱ्या या बाजारावर पालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.