मुलुंड महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंड महोत्सवाची सांगता
मुलुंड महोत्सवाची सांगता

मुलुंड महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः दर वर्षी आमदार मिहीर कोटेचा मुलुंडमधील नागरिकांसाठी मुलुंड महोत्सव आयोजित करतात. या वर्षीही जवळपास तीन आठवडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो मुलुंडकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मुलुंड महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंची अंतिम फेरी मुलुंड येथील छत्रपती संभाजी राजे सभागृहात पार पडली. या महोत्सवात क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल अशा विविध खेळांचा समावेश होता. यामध्ये विविध गटांसाठी मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच या वेळी शाहीर नंदेश उमप यांच्या सदाबहार संगीत मैफिलीचा रसिकांनी आस्वाद घेतला. या कार्यक्रमाला खासदार मनोज कोटक आणि मुलुंडचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

भावी अभियंत्यांनी रंगविल्या भिंती
प्रभादेवी, ता. १२ (बातमीदार) : समाजिक दृष्टिकोनातून पृथ्वीच्‍या रक्षणाबाबत जागृती करणारे विविध संदेश देणाऱ्या चित्रांनी स्वामी विवेकानंद कॉलेजमधील टेक्नॉलॉजी अभियंता विद्यार्थ्यांनी सुंदर अशा भिंती रंगविल्या. चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीच्या विद्यार्थ्यांनी प्रोफेसर अजिंक्य वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली व पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या सहकार्याने दादर चौपाटी येथे भिंती रंगवण्याच्‍या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १५० हून अधिक जण सहभागी झाले होते. परीक्षक गौरव भाटकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्रोफेसर अजिंक्य वळंजू, डॉ. सायली गारगे, प्रो. मनीषा जोशी आदी उपस्थित होते.

रोटा सायन्स विज्ञान स्पर्धा
मालाड, ता. १२ (बातमीदार) ः पवई येथे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१च्या वतीने सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले होते. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई, रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्स, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे या तीन क्लबच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरी व दुर्गम भागातील ६२ शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनात विज्ञान प्रकल्प आणि मॉडेल सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात उत्कृष्ट कल्पना आणि त्याचे आकर्षक सादरीकरण यासाठी दिली जाणारी अनेक पारितोषिके मिळाली. संदीप अग्रवाल व उन्‍नीकृष्णन यांनी स्पर्धा व प्रदर्शनाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. यापुढे दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संदीप अग्रवाल यांनी दिली.