मोबाईल आणि स्क्रीनच्या विळख्यातून मुलांची सुटका करणे गरजेचे!

मोबाईल आणि स्क्रीनच्या विळख्यातून मुलांची सुटका करणे गरजेचे!

चेंबूर, ता. १२ (बातमीदार) ः कोविड काळापासून लहान मुले मोबाईल आणि विविध प्रकारच्या स्क्रीनच्या अधीन गेली आहेत. हे एक मोठे संकट असून त्यातून मुलांची सुटका करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन न्यू होरायझन्स चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी केले. ‘न्यू होरायझन्स’च्या २० व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १०) वांद्रे येथेल बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

न्यू होरायझन्स संस्था २० वर्षांपासून गतिमंद मुलांसाठी आणि बालविकासासाठी काम करते. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गतिमंद मुलांमध्ये विकासात्मक विकारांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता कार्यक्रम झाला. चांगली कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टरांना त्यात सन्मान करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

‘अतिमोबाईल व टीव्ही बघण्याने मुलांमधील संवाद कौशल्य आणि वागणुकीत मोठा बदल झाला आहे. कोरोनानंतर लहान मुलांचा बौद्धिक विकास झाला नाही. त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे,’ असे डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले. न्यू होरायझन्सच्या विशेष शिक्षिका आणि संचालिका संध्या कुलकर्णी आणि विकासात्मक बालरोगतज्ज्ञ डॉ. बरखा चावला यांनी कार्यक्रमात मुलांच्या विकासाबद्दल मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ प्रा. डॉ. रशीद मर्चंट, मानसशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनुराधा सोवनी आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी प्रा. डॉ. ज्योतिका बिजलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलांसह नृत्ये सादर केली. कार्यक्रमाला इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वाय. के. आमडेकर, विद्यमान अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल पारेख, डॉ. रशीद मर्चंट, सल्लागार डॉ. अनंत तलौलीकर, प्रख्यात डॉक्टरांसह शिक्षणतज्ज्ञ, नागरी समाजाचे सदस्य आणि ५०० हून अधिक पालक आपल्या मुलांसह उपस्थित होते.

लॉकडाऊनमध्ये स्क्रीन टाईम वाढला
लॉकडाऊनदरम्यान मुलांमध्ये टीव्ही आणि मोबाईलचा स्क्रिन टाईम वाढत गेला. परिणामी २०२१-२२ अशा दोन वर्षांत केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या मुलांची संख्या वाढली. वर्षभरात २,२५७ मुलांवर उपचार करण्यात आले.

पालकांना आपल्या मुलांमध्ये कोणती समस्या आहे, हे कळत नाही. त्यामुळे उपचारास विलंब होतो. त्यामुळे मुलांच्या विकासातील विलंबाबाबत पालकांमध्ये जागरूक असणे गरजेचे आहे.
- डॉ. बरखा चावला, विकासात्मक बालरोगतज्ज्ञ

बालविकास हा बाल आरोग्याच्या मुख्य पैलूंपैकी एक आहे. बऱ्याचदा विभक्त कुटुंब, गॅझेट्सचे व्यसन आणि अभ्यासाचा ताण आणि पर्यावरणातील घटकांमुळे मुलांच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे विकासात्मक सेवा या प्रत्येक मुलापर्यंत वेळीच पोहोचणे आवश्यक आहे.
- डॉ. उपेंद्र किंजवडेकर, माजी अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिॲट्रिक्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com