
सफाळे रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचा शुभारंभ
पालघर, ता. १२ (बातमीदार) : सुमारे २० ते २५ हजार प्रवासी संख्या असलेल्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील सफाळे स्थानकामध्ये फलाट क्र. दोनवर बहुप्रतिक्षित सरकत्या जिन्यांचा शुभारंभ रविवारी (ता. १२) करण्यात आला. या वेळी सफाळे स्टेशन कमिटीचे अध्यक्ष जतीन कदम, उपाध्यक्ष पंकज म्हात्रे, सदस्य प्रशांत किणी, प्रतिभा कदम, अक्षय सत्पाळकर, स्टेशन मास्तर चुनीलाल अगलेसर, रेल्वे संघटनेचे अरुण घरत, तसेच रेल्वे सुरक्षा पोलिस, प्रवासी वर्ग उपस्थित होते.
सफाळे रेल्वेस्थानकात सातत्याने गर्दीचे प्रमाण वाढत असताना ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व माल वाहतूक करणारे यांच्याकरिता सरकत्या जिन्यांची आवश्यकता निर्माण झाली होती. मागील दोन वर्षांपासून सफाळे स्टेशन कमिटीने सरकत्या जिन्यांची मागणी निवेदने देऊन केली होती. रेल्वे प्रशासनाने अखेर हिरवा कंदील दाखवत सफाळे स्टेशन कमिटीच्या कार्यकारिणीला बोलावून उद्घाटन करण्याची विनंती केली. स्टेशन कमिटीचे सदस्य प्रशांत किणी यांच्या हस्ते जिन्यांचे उद्घाटन करण्यात आले.