भालचंद्र नेमाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालचंद्र नेमाडे
भालचंद्र नेमाडे

भालचंद्र नेमाडे

sakal_logo
By

‘कोसला’कार नेमाडे

कादंबरी, समीक्षा, कविता, भाषाभ्यास, संतसाहित्याचा अभ्यास इत्यादी क्षेत्रांतील भालचंद्र नेमाडे यांची कामगिरी प्रसिद्ध आहे. परंपरेपेक्षा सर्वस्वी वेगळी व मौलिक अशी साहित्यनिर्मिती, साहित्यविचार करणारे लेखक असा त्यांचा लौकिक आहे. ग्रामीण, शहरी अशा कोणत्याही वर्गवारीत न बसणाऱ्या कादंबऱ्यांतून त्यांनी व्यापक अर्थाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचा खोलवर शोध घेतला.

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित भालचंद्र नेमाडे यांचा जन्म जळगावच्या सांगवी गावातील. १९३८ मध्ये जन्मलेल्या नेमाडे यांनी पहिली कादंबरी ‘कोसला’ वयाच्या २५ व्या वर्षी लिहिली. मराठी साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते. ‘कोसला’च्या यशानंतर त्यांनी चांगदेव पाटील नावाच्या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील ‘बिढार’, ‘जरीला’ व ‘झूल’ या कादंबऱ्या लिहिल्या. ३५ वर्षे विवेचन करून लिहिलेली ‘हिंदू’ ही कादंबरीही प्रचंड गाजली. ‘मेलडी’, ‘देखणी’ हे कवितासंग्रह; ‘साहित्याची भाषा’, ‘टीकास्वयंवर’, ‘तुकाराम’, ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’, ‘दि इनफ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी’, ‘अ सोशिओलिंग्विस्टिक ॲण्ड स्टायलिस्टिक स्टडी’, ‘नेटिविझम’ मराठी-इंग्रजी समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांकडे तुच्छतेने पाहणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठितांच्या दांभिक वर्तनाचा परिस्फोट घडवणारे अनेकविध प्रसंग त्यांच्या कादंबऱ्यांनी साकार केले. साहित्यसेवेच्या सन्मानार्थ त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, पद्मश्री, जनस्थान पुरस्कार आदी सन्मान प्राप्त झाले आहेत.