पुनर्वापराचे तंत्रज्ञान वापरून रस्त्यांची कामे करावी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्वापराचे तंत्रज्ञान वापरून रस्त्यांची कामे करावी!
पुनर्वापराचे तंत्रज्ञान वापरून रस्त्यांची कामे करावी!

पुनर्वापराचे तंत्रज्ञान वापरून रस्त्यांची कामे करावी!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : पाणी हा रस्त्यांचा एक नंबरचा शत्रू आहे. त्याला जितके लांब ठेवाल तितका रस्ता जास्त काळ सुस्थितीत राहील. त्यासाठी रस्ता तयार करताना त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे अथवा अन्य पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करणे गरजेचे आहे. रस्ता तयार करण्याआधीच भूमिगत पाईपलाईनचे काम होणे आवश्यक आहे. ऑस्‍ट्रेलियातील सिडनी येथे स्टील उत्पादनातील मळी वापरून रस्ते तयार करण्यात आले आहेत. राज्यात हा प्रयोग सगळीकडेच यशस्वी होईल, असे नाही; परंतु कारखान्‍यात पुनर्वापर करता येणाऱ्या टाकाऊ वस्‍तूंवर प्रयोग करून, असे रस्ते तयार करता येतील, असे मत महामार्गनिर्मिती तज्‍ज्ञ डॉ. विजय जोशी यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.

ब्राह्मण सभा डोंबिवली यांच्या वतीने ‘विजयपथ ः एक संवाद रस्त्यांविषयी’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात महामार्ग निर्मिती तज्‍ज्ञ डॉ. विजय जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले होते. संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी डॉ. विनय भोळे, सुचेता पिंगळे, श्रीकांत कानडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यातील रस्त्यांची दुरवस्था आहेच. कल्याण-डोंबिवली शहर हे रस्त्यांवरील खड्ड्यांनी चांगलेच गाजले आहे. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असले, तरी रस्त्यांचा दर्जा पाहता ते कितपत टिकतील. सिडनी येथे जोशी यांनी राबविलेला प्रयोग राज्यात अथवा कल्याण-डोंबिवलीत राबविणे शक्य आहे का आदी विषयांवर या वेळी संवाद साधण्यात आला. डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे स्टील उप्तादनात तयार होणाऱ्या मळीचा वापर करून अनेक रस्ते बांधले गेले आहेत. या रस्त्यांमध्ये सिडनी विमानतळाच्‍या धावपट्टीपासून ते देशातील वेगवेगळ्या भागांमधून जाणारे शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग यांचाही समावेश आहे.
------------------------------------------
सामाजिक बांधिलकीची गरज
भारत सरकारला स्टीलपासून निर्माण होणाऱ्या मळीपासून रस्ते तयार करण्याचा सल्ला जोशी यांनी दिला असून त्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शक्य त्या ठिकाणी रिसायकल मटेरिअल वापरून रस्ते तयार होत असल्यास सरकारने तसा जीआर काढावा. असे रस्ते तयार करताना सरकारच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
--------------------------------------
रस्ता दीर्घकाळ चांगला रहावा, यासाठी त्यावर पाणी साचू न देणे हे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था असावी. आपल्याकडे रस्ता तयार झाला नाही की, पाईपलाईनचे काम किंवा इतर कामासाठी तो खणला जातो.
-डॉ. विजय जोशी, महामार्ग निर्मितीतज्‍ज्ञ