
खताच्या तुटवड्यामुळे दुबार शेती संकटात
रोहा ता. १३ (बातमीदार) ः तालुक्यातील कोलाड खांब विभागात रासायनिक तथा युरिया खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खरीप हंगामानंतर काही शेतकरी रब्बी हंगामात दुबार भातशेतीची लागवड करतात. मात्र खत विक्रेत्यांकडून वेळेवर खत मिळत नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या खांब, कोलाड व वरसगाव परिसरातील शेतकरी येथील कालव्याच्या पाण्यावर दुबार भात पीक घेतात. तर डिसेंबरअखेर कुंडलिका नदीच्या उजव्या व डाव्या तीर कालव्याला पाटबंधारे खात्याने पाणीही सोडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. भात लागवडीची कामे वेगाने सुरू असतानाच खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
खत विक्रेते किरकोळ पद्धतीने खत विक्री करत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच काही ठिकाणी चढ्या भावाने खतांची विक्री होत आहेत. शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात गरज असली तरी केवळ १ ते २ किलोच खत दिले जात आहे. वेळेवर युरिया खत उपलब्ध होत नसल्यामुळे भात लागवडीनंतर भाजीपाला लागवडीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकाला कीड लागू नये म्हणून खत वापरले जाते, मात्र सरकारकडूनच खत पुरवठा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी दुबार लागवड केली आहे, मात्र युरिया खताचा तुटवडा आहे. खत विक्रेत्यांकडे पुरेसा खत उपलब्ध नसल्याने ते किरकोळ खत विक्री चढ्या भावाने करीत आहेत. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.
- चंद्रकांत सावंत, प्रगतशील शेतकरी