
हुंड्यासाठी धारावीत पतीकडून पत्नीची हत्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : धारावीत हुंड्यासाठी पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती कन्हैयालाल सरोज याला अटक केली आहे. या प्रकरणात मृत पत्नीच्या सासू-सासऱ्यांवरही गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पतीने मोठ्या चलाखीने पत्नीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता; परंतु तपासाअंती तिची हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले.
धारावी येथील शताब्दी नगर येथे रोशनीकुमार सरोज या विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. ११) मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रोशनीकुमार यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, रोशनीकुमार यांचे वडील सुरेशकुमार सरोज यांच्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी त्यांचे पती कन्हैयालाल सरोज यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होती.
हुंड्यासाठी त्यांच्या मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, अशी तक्रार तिच्या वडिलांनी केली होती. तसेच महिलेच्या सासू-सासरे यांच्यावरही आरोप केले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यात अधिक तपास केला असता, रोशनीकुमारची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आल्याचे पोलिसांनी तपासाअंती सांगितले.