आम्ही पण तयार आहोत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही पण तयार आहोत
आम्ही पण तयार आहोत

आम्ही पण तयार आहोत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : हिंमत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कोणत्याही निवडणुका लावून दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे. ठाकरे यांच्या आवाहनाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर देताना निवडणूक येऊ तर द्या, आम्ही पण तयार आहोत. देशात निवडणूक आयोग आहे की नाही, निवडणुका घेऊन दाखवा म्हणजे काय? असा मिश्किल टोलादेखील शिंदे यांनी लगावला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवलीमधील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कोर्ट व वातानुकूलित अभ्यासिकेचे लोकार्पण रविवारी (ता. १२) खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार डॉ. शिंदे यांनी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. निवडणुका घेऊन दाखवा म्हणजे काय? देशात, महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही, असा सवाल खासदार शिंदे यांनी केला. कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे. असे सगळे असताना निवडणूक घ्या, निवडणूक घ्या, असे बोलले जात आहे. आम्ही पण तयार आहोत निवडणुकीला. निवडणूक येऊ द्या तरी, असे मिश्किल हसत उत्तर दिले.

--------------------------
अनुराग ठाकूर आज कल्याण दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. मंगळवारी (ता. १४) भाजपच्या होणाऱ्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा ठोकणार का, या चर्चांना उधाण आले आहे. यावर खासदार डॉ. शिंदे म्हणाले, याआधीदेखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण मतदारसंघात आले होते. मी स्वतः त्यांचे स्वागत केले होते. आता ते पुन्हा मंगळवारी येथे येणार आहेत. त्यांचे स्वागत मी मतदारसंघाचा खासदार म्हणून करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी असते. त्या दृष्टिकोनातून ते काम करत असतात, पावले उचलत असतात. येणाऱ्या काळात डबल इंजिनचे सरकार चांगल्या प्रकारे अजून मजबुतीने काम करत राहील, असे त्यांनी सांगितले.