दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा

दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पालघर, ता. १३ (बातमीदार) : मनोर ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सदस्य नीता पाटील, विनया पाटील, प्रतिभा गुरोडा यांनी भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयातील दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी प्रकाश निकम यांनी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयात ज्या दिवशी संबंधित महिलेला दाखल केले, त्या दिवशी मोबाईलवरून संपर्क करूनही डॉक्टर आले नाहीत. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, तसेच जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासींना चांगले उपचार मिळायलाच हवेत, असे सांगून यापुढे जर असा प्रकार घडला तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निकम यांनी यावेळी केली. तसेच हा प्रकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून कारवाईची मागणी करणार असल्याचे यावेळी अध्यक्ष निकम यांनी सांगितले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व लिपिक हे मनमानी करणारे असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सदर घटनेची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करा, असे आदेश अध्यक्षांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले. रुग्णालयाची पाहणी केली असता अध्यक्ष निकम व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी ग्रामीण रुग्णालयाबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेले ग्रामीण रुग्णालय मनोर आहे. या रुग्णालयाची स्वच्छता, बंद पडलेल्या मशिनरी, स्वच्छतागृह, रिक्त पदे इत्यादी समस्या तातडीने सोडवा, अशी सूचना निकम यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com