वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : सिग्नल तोडून भरधाव वेगात पळणाऱ्या कारचालकाला अडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर कार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कारच्या बोनेट वरच दीड किलोमीटर फरफटत नेत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना वसईच्या एव्हरशाईन परिसरात रविवारी (ता. १२) रात्री घटना घडली. या घटनेत वाहतूक पोलिस वाचला असून, किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत आरोपीविरोधात वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आज (ता. १३) त्याला वसई न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली.

सोमनाथ कचरू चौधरी हा वाहतूक पोलिस हवालदार वसई पूर्वेतील वसंत नगरी सिग्नलवर रविवारी रात्री कर्तव्य बजावत होता. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कार क्रमांक यूपी ३२ डीजे ७७०७ चा चालक सावेश जफ्फर सिद्दीकी (वय २१, रा. गोलानी नाका, वसई पूर्व) हा वाहन चालवण्याचे परवाना नसताना सिग्नल तोडून, भरधाव वेगात कार चालवत होता. यावेळी कर्तव्यावरील पोलिस हवालदार चौधरी याने हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. वाहतूक पोलिस कारसमोर गेला असता त्यांना कारच्या बोनेट वरच घेऊन चक्क वसंत नगरी सर्कल ते रेंज नाकापर्यंत दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी काही जागरूक वाहनधारकांनी कारच्या समोर आडवे वाहन लावून कार थांबवून कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.