राष्ट्रीय संस्कृती महोत्सव २०२३

राष्ट्रीय संस्कृती महोत्सव २०२३

आझाद मैदानात समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक
राष्ट्रीय संस्कृती महोत्सवातील कलाविष्कारातून प्रेक्षक मंत्रमुग्ध
मुंबई, ता. १४ : आपला देश विविधतेने नटलेला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला म्हणून ओळखला जातो. आपल्या महान भूमीतील कला, हस्तकला आणि पाककृतीसारख्या संपदेचा आस्वाद घेण्यासाठी अनेक उत्सव साजरे केले जातात. आझाद मैदानात सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव २०२३’मध्ये याची झलक पाहायला मिळते. ११ फेब्रुवारीपासून महोत्सवाला सुरुवात झाली. १९ फेब्रुवारीपर्यंत तो सुरू राहणार आहे.
महोत्सवादरम्यान सोमवारी (ता. १३) प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानिमित्त पार पडलेला ‘रिमेम्बरिंग पंचम’ कार्यक्रम तसेच नागालॅण्ड कन्झर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयरमध्ये कलाकारांनी आपल्या कलाविष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाचे उद्‍घाटन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रे आणि अकादमी कार्यक्रमात सहभागी होत असून राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने तो आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात संपूर्ण भारतातील जवळजवळ ३५० लोककलाकार सहभागी होणार आहेत. आदिवासी कलाकार, जवळजवळ ३०० स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर कलावंत, दिव्यांग कलाकार, ख्यातनाम शास्त्रीय कलाप्रकारांचे सादरकर्ते आदी आपल्या चित्ताकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि त्यांना प्रेरणा देतील. भारतातील सर्व राज्यांमधून आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे १५० कारागिरांना ‘आंगन’अंतर्गत त्यांच्या कला आणि हस्तकला प्रकारांची विक्री आणि प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, त्यासाठी सुमारे ७० स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी २५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मैदानावर फूड कोर्टही असून त्यामध्ये भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्याचे स्टॉल आणि भरडधान्यांचे खाद्यपदार्थ सादर करणारे सुमारे ३७ स्टॉल उपलब्ध आहेत.

आरडींना आदरांजली
सोमवारी (ता. १३) दिग्गज संगीतकार आर. डी. बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. राज सोढा, किशोर सोढा आणि सिद्धार्थ एंटरटेनर्स यांनी सादर केलेला कार्यक्रम महोत्सवाचे खास आकर्षण ठरला. भारतीय शास्त्रीय संगीत आणि आयकॉनिक बॉलीवूड संगीतासह विविध परफॉर्मन्सने प्रेक्षकांना संगीतमय जगाचा फेरफटका घडवून आणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com