
पावसाळी नालेसफाईला सुरुवात
नवीन पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : हस्तांतरणानंतर पनवेल महापालिकेमार्फत सिडको वसाहतीतील पावसाळी गटारे, नाले व अंतर्गत नालेसफाई करण्यात येत आहे. त्यामुळे वसाहतीमध्ये यंदा पाणी तुंबणार नाही, याबाबतची खबरदारी पालिकेकडून घेतली जाणार असून, त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, कामोठे या ठिकाणी शेकडो कमी लांबीचे पावसाळी गटारे व नाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी या गटारांची मान्सूनपूर्व सफाई पालिकेमार्फत सुरू आहे. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यंतरात हे कामे पूर्ण केले जाते; परंतु यावेळी हे काम सिडकोकडून पालिकेने हस्तांतरित करून घेतले आहे. पालिकेने पावसाळा सुरू होण्याआधीच नाल्यांमधील कचरा बाहेर काढून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खबरदारी घेतली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून सिडकोने नालेसफाईकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलेले होते. त्यामुळे आजवर प्रत्येक वर्षी कमी पावसातच सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सध्या चालू असलेल्या नालेसफाईमधून निघणाऱ्या दगड, माती, गाळ व कचऱ्याचे ढीग कळंबोली व सिडको वसाहतीमधील पदपथांवर दिसत आहेत. दोन चेंबरमधील गाळ व मातीही काढली जाणार आहे. ज्या ठिकाणी जास्त अंतरामुळे गाळ काढता येत नाही, अशा ठिकाणी नाल्याचा स्लॅब तोडून नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेमार्फत देण्यात आली आहे.