
बेशिस्तीमध्ये खारघरवासी आघाडीवर
खारघर, ता. १४ (बातमीदार) : खारघर परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. वर्षभरात शहरातील १२ हजार ८३४ जणांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. त्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांमध्ये खारघरवासी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
विकसित होत असलेल्या खारघर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एकीकडे शहरात वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाहतूक नियमांचे उल्लंघनदेखील होत आहे. जानेवारी ते डिसेंबर या एक वर्षाच्या कालावधीत जवळपास १०,०१७ विनाहेल्मेट वाहन चालकांवर; तर सिग्नल तोडणाऱ्या २,२४५ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ५४४ व्यक्ती; तर मद्यप्राशन करणाऱ्या वीस वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर बेकायदा प्रवासी वाहतूक, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, विनापरवाना वाहन चालवणे अशा प्रकरणीदेखील कारवाई करण्यात आली आहे.
-----------------------------
चार वर्षांच्या तुलनेत घट
२०१९ मध्ये खारघर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५,९३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. २०२० मध्ये १४,६९१ आणि २०२१ मध्ये १७,६७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे; तर २०२२ या वर्षात १२ हजार ८३४ कारवाई झाली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांबाबत पोलिसांकडून होत असलेल्या जनजागृतीच्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.
-----------------------------------
बेकायदा प्रवासी वाहतूक दुर्लक्षित
खारघर ते तळोजा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवासी वाहने सुरू आहेत; मात्र वाहतूक पोलिसांकडून एका वर्षात फक्त आठ बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-------------------------------------
वाहतूक पोलिसांकडून कारवाईसोबत वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती दिली जात आहे. तसेच चालकांनीदेखील वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याऐवजी नियम पाळणे गरजेचे आहे.
- योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, खारघर