
स्वच्छतागृहाभावी गैरसोयीचा सामना
वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई पूर्वेकडे जुने सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालय होते. मात्र हे स्वच्छतागृह सात महिन्यांपूर्वी पालिकेकडून तोडण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छतागृह असावे, यासाठी असल्याने महिलांसह स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबवली. यात महापालिकेने स्वच्छता गृह उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
संभाजी नगर येथे राहणाऱ्या लोकांसाठी ३० वर्षांपूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालय उभारण्यात आले होते. येथे १६ बाथरूमची व्यवस्था होती. मात्र पर्यायी व्यवस्था न करता हे स्वच्छतागृह तोडण्यात आले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेचे परिवहन सभापती भरत गुप्ता, माजी नगरसेवक मनोज राय यांनी नागरिकांची भेट घेत चर्चा केली. या वस्तीत हजारो नागरिक राहत असून याठिकाणी गेल्या सात महिन्यांपासून शौचालय नाही. त्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु याठिकाणी अस्वच्छता, अन्य घटना घडत असल्याने ही कारवाई केल्याचे म्हणणे पालिका प्रशासनाचे आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि माजी नगरसेवक मनोज राय यांनी समस्येची माहिती कळविल्याने घटनास्थळी भेट दिली. या संबंधी महापालिकेचे आयुक्त यांची भेट घेऊन येथील नागरिकांना सुलभ शौचालयाची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- भरत गुप्ता, सभापती, परिवहन विभाग
----------------------------
संभाजी नगर येथे असलेले स्वच्छतागृह पालिकेकडून तोडण्यात आल्याने येथील वस्तीतील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन तोडगा काढावा.
- मनोज राय, माजी नगरसेवक
--------------------------
वसई पूर्वेकडील शौचालय पाडण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरत होती. तसेच काही आक्षेपार्ह प्रकार तेथे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. त्यामुळे हे स्वच्छतागृह तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. जर स्वच्छता ठेवण्यासाठी कोणी जबाबदारी घेणारे पुढे आहे तर निर्णय घेऊ.
- अनिलकुमार पवार, आयुक्त.
--------------
वसई : शौचालयासाठी महिलांनी सह्यांची मोहीम राबवली.