बनावट कागदपत्रांनी भूखंड हडप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कागदपत्रांनी भूखंड हडप
बनावट कागदपत्रांनी भूखंड हडप

बनावट कागदपत्रांनी भूखंड हडप

sakal_logo
By

पनवेल, ता. १५ (वार्ताहर) : कळंबोली सेक्टर- १४ मधील १०२ मीटर भूखंडाची एका टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीने या भूखंडावर चार मजली इमारतीचे बांधकाम केले असून कळंबोली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौदी अरेबिया येथे नोकरीनिमित्त राहणारे सुरेश पाल ऊर्फ सुरेश गजराज सिंग पुंडीर (वय-६२) यांनी सिडकोच्या वतीने कळंबोली सेक्टर-१४ मधील रो-हाऊससाठी जागा खरेदी केली होती. त्यावेळी सुरेश यांनी सिडकोला ५ लाख ५२ हजार देऊन कळंबोली सेक्टर-१४ मधील फ्लॉट नं.ए-१८ येथील १०२.०७ मीटरचा रो-हाऊससाठीचा भूखंड खरेदी केला होता. याचदरम्यान सुरेश पाल कामानिमित्त परदेशात गेल्याने त्यांना जागेचे रजिस्ट्रेशन करता आले नव्हते. अखेर डिसेंबर २००३ मध्ये त्यांनी या भूखंडाचे रजिस्ट्रेशन करून घेतले होते. अशातच सुरेश पाल व त्याचे कुटुंबीय नोकरीनिमित्त परदेशात असल्याने नवी मुंबईत आल्यानंतर पाल कळंबोलीतील भूखंडाची पाहणी करण्यास जात होते. मात्र २०१८ नंतर कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांना भारतात येणे शक्य झाले नसल्याने पाल यांचा भूखंड बळकावण्यात आला आहे.
-------------------------------
सिडको अधिकाऱ्यांशी संगनमत
सुरेश पाल यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून ते कळंबोली येथील सिडकोच्या कार्यालयात सादर करण्यात आले होते. त्यानंतर या टोळीने सिडकोच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून पाल यांच्या नावावर असलेला भूखंड खारघर सेक्टर-३५ मध्ये राहणाऱ्या अमित पाठक याला विक्री केला आहे. त्यानंतर अमित पाठक याने स्वप्नील पोपेरे याला भूखंड विक्री केल्याची कागदपत्रे तयार करून सिडकोच्या कार्यालयात सादर केली. त्यानंतर पोपेरे यांनी या जागेवर चार मजली इमारत उभी केली आहे.
-----------------------------
तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे कळंबोलीतील रो-हाऊससाठी असलेला १०२ मीटरचा भूखंड विक्री करून फसवणूक केल्याचे आढळून आल्यानंतर कळंबोली पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेला तोतया सुरेश पाल, अमित पाठक, स्वप्नील पोपेरे व इतर आरोपींच्या विरोधात फसवणुकीसह बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.