
नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अनुभवली शाळा
पालघर, ता. १५ (बातमीदार) : आर्यन एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने या संस्थेच्या पालघर येथील म. नी. दांडेकर विद्यालयात माजी विद्यार्थी, शिक्षक, यांचा स्नेहभेटीचा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला ९० वर्षे पासून आतापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली होती. मोठ्या उत्साहात सर्व माजी विद्यार्थी आपल्या जुन्या स्नेहभेटीचा आनंद लुटत होते.
या कार्यक्रमात पुन्हा एकदा शाळा भरवण्यात आली. सकाळी ११ वाजता घंटा झाल्यानंतर नेहमीची प्रार्थना, राष्ट्रगीत व प्रतिज्ञा झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. काही विद्यार्थी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपली वर्ग खोली परिसर यांना भेटी देताना दिसत होते. मी कोणत्या वर्गात होतो, कोणत्या बेंचवर बसत होतो, माझा शेजारी कोण होते याची आठवणी काढताना हे विद्यार्थी तल्लीन झाले होते. या सर्व आजीमाजी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी आर्यन एज्युकेशन संस्थेच्या विश्वस्त व कार्यकारणी यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्यन एज्युकेशनचे विश्वस्त भरत उमराळे होते. या वेळी खजिनदार किशोर खरे, समन्वय समितीचे अध्यक्ष केदार काळे, संयुक्त कार्यवाह विपुला राऊत पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष उपेंद्र घरत, कार्यकांनी सदस्य प्रज्ञा ठाकूर, कमलेश वारियास परेश पाटीलस संतोष चूरीस प्रशांत संखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वय समितीचे अध्यक्ष केदार काळे यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष करून शिक्षक राजेंद्र राऊत, उपमुख्याध्यापक पंकज दळवी, मुख्याध्यापिका नूतन पाटील, शिक्षक जगन्नाथ घरात, मुख्याध्यापिका स्नेहा सोनार व इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
आर्यन एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबई येथे १९ फेब्रुवारी १८९७ साली झाली. पालघर येथे या संस्थेची शाखा १९३० साली होऊन म. नी. दांडेकर या शाळेची स्थापना करण्यात आली. ही शाळा उभारल्याने पालघर, डहाणू, सफाळे, विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा आदी परिसरातील लाखो विद्यार्थी या शाळेतील शिकून उच्च स्तरापर्यंत पोहचले आहेत.