
महामार्गावर चारोटी येथे भीषण अपघात
कासा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल पंपासमोर कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारी (ता. १४) सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी कंटेनरच्या खाली अडकल्याने दुचाकीवरील तिघे ७० ते ८० फूट फरपटत गेले. या तिघांचा जागीच मृत्यू झाला. काकड्या रांधे (वय ४४, रा. सूत्रकार), स्वप्नील रांधे (वय २४, रा. सूत्रकार) व विष्णू कान्हात (वय २८, रा. लाहोरी, खाचपाडा) अशी मृतांची नावे आहेत. महामार्ग पोलिस, कासा पोलिस व महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ धाव घेत मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूस करत काही काळ झालेली वाहतूक कोंडी सोडवली.
एशियन पंपवर पेट्रोल भरण्यासाठी वळण घेत असताना महामार्गावरून अनेक अपघात होत आहेत. यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने येथील नागरिकांसाठी जाण्या-येण्यासाठी सेवा रस्ता पूर्ण करावा, येथे भुयारी मार्ग करावा, अशी मागणी यापूर्वी केली आहे; परंतु यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे अजून किती बळी गेल्यावर हा सेवा रस्ता पूर्ण होईल, असा सवाल येथील ग्रामस्थ व वाहनचालक उपस्थित करीत आहेत.