रस्ते अपघातातील मृत्यूत ३० टक्क्यांनी घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते अपघातातील मृत्यूत ३० टक्क्यांनी घट
रस्ते अपघातातील मृत्यूत ३० टक्क्यांनी घट

रस्ते अपघातातील मृत्यूत ३० टक्क्यांनी घट

sakal_logo
By

केदार शिंत्रे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१४ : मुंबई शहरात गेल्या वर्षी झालेल्या अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण घटल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०२१ वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये मुंबईत गंभीर भीषण रस्ते अपघातात लक्षणीय घट झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२२ मध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. अपघातांत गंभीर जखमी होण्याच्या संख्येतही घट झाली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत २०२२ मध्ये अपघाती मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात असून केवळ २६८ जणांना जीव गमवावा लागला आहे.
२०२१ मध्ये ३७६ च्या तुलनेत एकूण २६८ मृत्यू झाले आहेत. २०२२ मध्ये एकूण १ हजार ७३८ अपघात घडले. त्यापैकी २५७ गंभीर अपघातांत २६८ जणांचा मृत्यू झाला. ११७२ अपघातांत १२८७ जण गंभीर जखमी झाले. ३०९ किरकोळ अपघातांमध्ये ३४३ जण जखमी झाले. अपघाताचे प्रमाण घटले असले तरी २६८ जणांना जीव गमवावा लागला हेदेखील महत्त्वाचे आहे.

यंदाच्या वर्षी ४६ अपघात
२०२३ च्या जानेवारीपर्यंत मुंबई शहरात एकूण ४६ अपघात झाले. त्यांपैकी १० गंभीर अपघातांत १२ जणांनी जीव गमावला. ३२ अपघातांत ३८ गंभीर जखमी झाले. पाच किरकोळ अपघातांमध्ये सहा जण जखमी झाले.

३९८ कोटींचा दंड वसूल
१. अपघाती मृत्यूच्या संख्येत घट झाली असली तरी आकडेवारी पाहता मुंबईतील नागरिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसते. मुंबई वाहतूक पोलिसांनी २०२१ मध्ये २२२.६७ कोटींचा दंड वसूल केला होता. त्या तुलनेत २०२२ मध्ये ३९८.११ कोटी दंडापोटी आकारण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.
२. वाहतूक पोलिस नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मुंबईचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे आकडेवारीनुसार दिसते.
३. अनेक मुंबईकर वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करत नसल्याचे आकडेवारीत दिसते. मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट न घातल्याबद्दल १,२१,५३७ प्रवाशांना आणि २,२२,१७४ चारचाकी चालकांना चलान दिले आहे.

सुरक्षेसाठी सरकार आग्रही
कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला. वापर. त्याचा परिणाम आकडेवारीत पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसाठी रस्ता सुरक्षा वाढवण्याच्या प्रयत्नात सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई-गुजरात महामार्गावर झालेल्या अपघातानंतर सीट बेल्ट नियमन लागू करण्यात आले. रस्ते अपघातांतील मृत्यूची संख्या कमी करणे आणि चालक व प्रवाशांची सुरक्षा जपण्याचा उद्देश त्यामागे आहे.

वर्ष गंभीर दुर्घटना एकूण अपघात
- २०१७ ४६७ ३०७०
- २०१८ ४५६ ३०६९
- २०१९ ४२० २७५६
- २०२० ३३७ १७२७
- २०२१ ३७६ २०६१
- २०२२ २६८ १७३८
जानेवारी २०२३ पर्यंत १० ४६